ज्येष्ठ अभिनेते विजय कदम म्हणणार ‘जिंदगी नॉट आऊट’

सामना ऑनलाईन । मुंबई

विजय कदम यांनी कलाकार म्हणून मराठी सिनेसृष्टीला दिलेलं योगदान लाखमोलाचं आहे. गेली ४३ वर्षे रंगभूमीची सेवा करणारे रंगकर्मी व चतुरस्त्र अभिनेते विजय कदम, अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर येणार आहेत. मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील या प्रसिद्ध अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले. मनाने युवा असलेले विजय कदम झी युवा या वाहिनीच्या लोकप्रिय मालिका ‘जिंदगी नॉट आऊट’ या मालिकेद्वारे पुन्हा छोट्या पडद्यावरील नवीन इनिंग खेळणार आहेत. कुटुंबातील एका व्यक्तीच्या डोळ्यातील स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जेव्हा सगळ्यांची साथ मिळते तेव्हा त्या स्वप्नपूर्तीलाही वेगळेच तेज येते. याच भावविश्वावर आधारित ‘जिंदगी नॉट आऊट ‘ ही मालिका झी युवा या वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता पहायला मिळते. या मालिकेद्वारे विजय कदम त्यांचा मराठी मालिकेमधील कम बॅक करत आहेत

जिंदगी नॉट आउट ह्या मालिकेत २१ वर्षाच्या सचिन देसाई या मुलाचं क्रिकेट या खेळावरील प्रेम आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेलं त्याचं कुटुंब आपल्याला पाहायला मिळतंय. सचिनच्या या स्वप्नात येणाऱ्या अडचणी आणि त्याला संपूर्ण कुटुंब कसे तोंड देतं, हे पाहताना नकळतपणे आपल्याला आपल्या कुटुंबाची नव्याने ओळख होते. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. मुख्यतः क्रिकेट हा खेळ ज्यांच्यासाठी धर्म आहे अशी तरुण मंडळी ही मालिका आवडीने पाहते आहे. मालिकेत सर्वोतोपरी क्रिकेट साठी आयुष्य देणाऱ्या सचिनला एका योग्य क्रिकेट कोच ची गरज असते, पण पैसे नसल्या कारणाने त्याला योग्य संधी मिळत नाही. याच वेळी त्याची क्रिकेट मधील द्रोणाचार्य असलेल्या विजय कदम यांची भेट होते.

आता विजय कदम सचिन ला त्याच्या करिअर मध्ये कशी मदत करतात हे पाहण्यासारखे असेल. आजच्या मध्यम वर्गीय कुटुंबातील प्रत्येक क्रिकेट वेड्या मुलाच्या हृदयाशी जाऊन भिडणारी अशी ही जिंदगी नॉट आउट मालिकेची कथा आहे. विजय कदम या मालिकेत सचिन देसाई चे क्रिकेट मधील द्रोणाचार्य म्हणजेच त्याचे कोच म्हणून येत आहेत. नेहमीच प्रेक्षकांना हसवणारे विजय कदम ही एक वेगळी भूमिका कशी सादर करतात हे नक्कीच पाहण्यासारखे असेल. या मालिकेमध्ये सचिन देसाई च्या भूमिकेत तेजस बर्वे व स्नेहाच्या भूमिकेत ज्ञानदा रामतीर्थकर आणि शैलेश दातार, वंदना वाकनीस, नेहा अष्टपुत्रे, सायली झुरळे, तेजश्री वालावलकर, स्वप्नील फडके, उज्वला जोग, प्रसन्ना केतकर, सिद्धीरूपा करमरकर, अथर्व नकती, राहुल मेहेंदळे, आदिश वैद्य असे अनेक कलाकार आहेत.