अद्दल घडली…आता मुद्दल देतो

मल्ल्या आठवड्याला 90 हजार रुपयांची फळे, भाज्या आणि इतर साहित्य खरेदी करतो

सामना प्रतिनिधी । लंडन

हिंदुस्थानातील बँकांना 9 हजार कोटींना चुना लावून लंडनला पळालेला उद्योगपती विजय मल्ल्याने कर्जाच्या मुद्दलाची परतफेड करण्याची तयारी दर्शविली आहे. कर्जाचे 100 टक्के मुद्दल मी देतो. कृपया ते स्वीकारा अशी विनंती मल्ल्याने बँकांना केली आहे. कर्जावरील व्याजाच्या परतफेडीबाबत मात्र त्याने काही स्पष्ट केलेले नाही.

बँकांचे कर्ज बुडवून मल्ल्या मार्च 2016 मध्ये हिंदुस्थानबाहेर पळाला. मल्ल्याला परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बँकांनी त्याच्याविरुद्ध लंडनच्या कोर्टात धाव घेतली असून तेथे खटला सुरू आहे. काही दिवसांपूर्वी लंडनच्या कोर्टाने मल्ल्याचे बँक खाते फ्रीज करण्याचे आदेशही दिले आहेत. हिंदुस्थान सरकारने प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. या कायदेशीर प्रक्रियेमुळे मल्ल्याला अद्दल घडली आहे. मल्ल्याने ट्विट करीत कर्जाचे 100 टक्के मुद्दल परत करतो, बँकांनी ते स्वीकारावे असे म्हटले आहे. याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाला माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले असल्याची माहिती मल्ल्याने दिली आहे.

‘किंगफिशर’ बुडाल्यामुळे कर्ज परत करू शकलो नाही
‘किंगफिशर एअरलाईन्स’चा विस्तार करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतले होते, परंतु एअरलाईन्सचे दिवाळे निघाल्यामुळे कर्जाची परतफेड करू शकलो नाही, असेही मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

मीडियावर आगपाखड
आणखी एका ट्विटमध्ये मल्ल्याने मीडियावर आगपाखड केली. मी तीस वर्षे विविध करूरूपाने राज्य आणि केंद्र सरकारला कोटय़वधी रुपयांचा निधी दिली. पण मीडिया याबाबत काहीच सांगत नाही. मीडियाने मला खलनायक बनविले असा आरोपही मल्ल्याने केला आहे.