मल्ल्या कसाबच्या बरॅकमध्ये?

सामना ऑनलाईन । मुंबई

देशातील पाच मोठ्या बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवणारा उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्राने लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण झाल्यावर त्याला आर्थर रोड तुरुंगातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलेल्या १२ नंबरच्या बरॅकमध्ये ठेवण्यात येणार असून त्याच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

मल्ल्याविरोधात ईडीचे स्वतंत्र आरोपपत्र
जुलै महिन्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयच्या संयुक्त टीमने वेस्टमिन्स्टरमध्ये जाऊन मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची याचिका लढणाऱ्या वकिलाला मल्ल्याविरोधात नवीन सबळ पुरावे सादर केले होते. त्याचबरोबर मल्ल्यासह नऊ जणांविरोधात ईडीने स्वतंत्रपणे लंडनच्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. यात मल्ल्याला प्रमुख आरोपी करण्यात आले असून हिंदुस्थानातून परदेशात बेकायदेशीरपणे पैसा नेल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.