मल्ल्याला हिंदुस्थानात आणल्यास कुठे ठेवणार आहे माहिती आहे का?

सामना ऑनलाईन, मुंबई

९ हजार कोटींचं कर्ज बुडवून पळालेल्या विजय मल्ल्याला हिंदुस्थानात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याला हिंदुस्थानात आणल्यावर कुठे ठेवायचा याचाही निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मल्ल्याला परत आणल्यास त्याला कसाबला ज्या कोठडीत ठेवलं होतं, त्या बरॅक नंबर १२ मध्ये ठेवण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच मल्ल्याला हिंदुस्थानात आणल्यानंतर मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने लंडनच्या कोर्टात दाखल केलेल्या उत्तरात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

मल्ल्याचं प्रत्यार्पण करायचं असेल तर त्याला कुठे ठेवण्यात येणार, जिथे त्याला ठेवण्यात येईल तिथली सुरक्षा व्यवस्था कडक आहे की नाही असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. प्रत्यार्पणासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा असून त्यावर निर्णय काय होईल हे बऱ्याच अंशी अवलंबून असतं. त्यामुळेच केंद्र सरकारने तुरूंग प्रशासनाशी बोलून याबाबतचा अहवाल तयार केला.

जुलै महिन्यात सक्तवसुली संचलनालय आणि सीबीआयने लंडनमधील सरकारी वकीलांना प्रत्यार्पणाबाबत हिंदुस्थानतर्फे जी माहिती सादर करावयाची आहे ती उपलब्ध करून दिली. कर्जबुडव्या मल्ल्या हा आर्थिक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असून त्याला हिंदुस्थानच्या हवाली केलं जावं अशी मागणी करण्यात आली आहे. जर १९९२ साली हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार हिंदुस्थानात पाठवायचं झालं तर त्याच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न विचारला जाणं स्वाभावित आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याची आधीच तयारी करून त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवणार असल्याचं सांगितलं आहे. आर्थर रोड तुरूंग हा १९२५ साली बांधण्यात आला होता. या तुरूंगाची क्षमता ८०४ कैद्यांची असली तर सद्यस्थितीत २५०० कैदी तिथे ठेवण्यात आले आहेत.