लेख : माजी विद्यार्थ्यांची आगळीवेगळी ‘गुरुदक्षिणा’

>>विकास काटदरे<<

परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या आर. एम. भट शाळेची स्थापना होऊन 2 सप्टेंबरला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला शाळेच्या सभागृहात सायंकाळी 4 वाजता गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेतेखासदार संजय राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आगळीवेगळी  ‘गुरुदक्षिणा’  दिली आहे. त्याचा हा परिचय.

कामगार वस्तीत गेले शतकभर गोखले शिक्षण संस्थेची आर. एम. भट शाळा विद्यादानाचे काम करत आहे. या शाळेतील माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत काम करत असले तरी ते आपल्या शाळेला अजून विसरले नाहीत. ज्या शाळेने आपल्याला घडवले त्या शाळेची आठवण त्यांना अजूनही आहे. इतकेच नव्हे तर ज्या शिक्षकांनी त्यांना शिकवले, कान धरला त्यांनाही ते विसरले नाहीत. 1992 साल असावे. शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक अशोक कोठावळे यांना मधुमेह झाल्याने त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. त्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी  त्रास होऊ लागला म्हणून माजी विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी शिवाजी मंदिरात एक कार्यक्रम आयोजित केला व त्यांना एक सायकल भेट दिली व काही निधी पण दिला. मला वाटतं, माजी विद्यार्थ्यांची ही पहिली ‘गुरुदक्षिणा’ असेल.

मध्ये बराच काळ गेला. मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू लागल्या होत्या. इंग्रजी माध्यमाचे स्तोम वाढू लागले होते. अशा काळात 2012 साली शाळेतील 1975 सालच्या बॅचचे माजी विद्यार्थी 25 वर्षांनंतर शाळेत एकत्र जमले होते. ज्या वर्गात त्यांनी शिक्षण घेतले त्याच 36 क्रमांकाच्या वर्गात ते जमले. शाळेत त्यांनी फेरफटका मारला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, शाळेच्या वर्गाची दुरवस्था झाली आहे. आपण किमान आपल्या वर्गासाठी काहीतरी करावे असा विचार त्या मुलांच्या मनात आला व त्यांनी सुमारे 2 लाख रुपये जमा केले. आपण ज्या 36 क्रमांकाच्या वर्गात शिकलो त्या वर्गाला रंगरंगोटी द्यायची व शाळेला गरज आहे त्या वस्तू द्यायच्या असा निर्णय त्यांनी घेतला व त्याप्रमाणे त्यांनी शाळेच्या सभागृहातील खुर्च्या, वर्गाला रंग, बाके, वायरिंग असे सर्व करून दिले व आपला वर्ग एकदम छान केला. शाळेसाठी आपण थोडेतरी केले या समाधानात सर्व विद्यार्थी आपल्या घरी गेले.

या गोष्टीला थोडा काळ गेला व माजी विद्यार्थी शाळेत येत होते. त्यांनाही शाळेची अवस्था पाहून वाईट वाटत होते. असे विद्यार्थी एकत्र आले. त्यामध्ये अजित सावंत, संजय घागरे, संजय खानविलकर, ज्योती राणे, अलका वष्ट, हेमंत, स्वप्नील असे अनेक विद्यार्थी जमले. शाळेची अवस्था पाहून काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले, पण काय हे त्यांना लक्षात येत नव्हते आणि त्यांना समजले की, 2018 मध्ये शाळेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हे लक्षात घेऊन शाळेच्या शताब्दीनिमित्त आपण शाळेसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटत होते, पण कमय ते सुचत नव्हते. काही शिक्षकांशी त्यांनी चर्चा केली व शाळेला रंगरंगोटीची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले, पण हे काम सोपे नव्हते.

 पुन्हा एकदा शाळेत !

त्या बैठकीत विविध बॅचच्या विद्यार्थ्यांना एकत्र करायचे तर मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम करायचा असे ठरले व सर्वांना पुन्हा एकदा शाळेत यायला आवडेल हे लक्षात घेऊन 18 जानेवारी 2015 साली ‘पुन्हा एकदा शाळेत’ हा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. सोशल मीडिया, वर्तमानपत्रांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना येण्याचे आवाहन करण्यात आले. साधारणपणे 1500 विद्यार्थी येतील असे वाटत असताना सुमारे 4 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शाळेत आले व ते पण आपलं वय विसरून पुन्हा शाळेच्या गणवेशात, डबा घेऊन. त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शाळेची अवस्था पाहून वाईट वाटले व सर्वांनी मिळून ठरवले की, प्रत्येक बॅचने वर्गणी काढून आपला वर्ग दुरुस्त करायचा, सुंदर करायचा. गेल्या 100 वर्षांतील 24 बॅचमधील विद्यार्थ्यांनी सुमारे 65 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करून त्या निधीतून 30 वर्गखोल्या, 2 शिक्षक खोल्या, 2 स्वच्छतागृहे हे सर्व दुरुस्त करून शाळेला नवे रूप दिले. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वर्षभरात प्रभात फेरी, रांगोळी प्रदर्शन, आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांना एनडीएची सफर छात्र सेना दिन असे अनेक उपक्रम राबवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी संघटित झाले व शाळा नवीकोरी झाली.

गेल्या 100 वर्षांत अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत नावारूपाला आले, पण काही समाजासाठी पडद्याआड काम करत आहेत. अशा काही माजी विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक गौरव येत्या 1 सप्टेंबरला ‘आर. एम. भट रत्न’ म्हणून गौरव करण्यात येणार आहे, तर 2 सप्टेंबरला शाळेच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शतायुषी शाळेत असा कार्यक्रम आयोजित केला आहे. या दिवशी शाळेचे नवीन पालटलेले वर्ग पाहण्यासाठी विद्यार्था येणार असून आपण तयार केलेले वर्ग शाळेला अर्पण करणार आहेत.

शाळा 100 वर्षे कामगार वस्तीत असूनही ज्ञानदानाचे काम करत आहे याचे श्रेय सर्वच संस्था चालकांना असले तरी आर. एम. भट शाळेला लौकिक मिळवून दिला तो कै. प्रिं. ना. गो. जोशी यांनी. शाळेसाठी त्यांनी विविध योजना राबवल्या. पण कुठेही स्वतःचे नाव दिले नाही ना शाळेत कुठे आपला फोटो लावला. ही गोष्ट आजच्या सर्वच संस्था चालकांनी लक्षात घेऊन अनुकरण केले पाहिजे असे वाटते.

(लेखक आर. एम. भट हायस्कूलचे माजी शिक्षक आहेत).