वरिष्ठांच्या छळामुळे एपीआय सागर खरे यांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । मुंबई

सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खरे (३०) यांचा मृत्यू वरिष्ठांच्या छळामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी खरे यांच्या कुटुंबीयांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेऊन केली. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर खरे यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या साताऱ्यातील गावी नेण्यात आला.

सागर खरे हे विक्रोळी पोलीस ठाण्यात काम करीत असताना अचानक खुर्चीतून खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल़ा. विक्रोळी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे हे वारंवार त्यांचा छळ करीत होते. यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप खरे यांच्या पत्नीने केला. खरे यांच्या कुटुंबीयांनी आझाद मैदान येथील प्रेरणा हॉल येथे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेतली. कोणताही गुन्हा घडला की, खरे यांच्यावर आरोपीला पकडण्यासाठी दबाव टाकला जाई. टोमणे मारणे, सतत अपमान करणे, एसीआर खराब करण्याची धमकी देणे असे प्रकार त्यांच्यासोबत सुरू होते असा आरोप त्यांचे मेहुणे वैभव पवार यांनी केला.