विक्रोळीच्या रुबी रुणालयात गर्भपाताच्या किट्सचा साठा

सामना ऑनलाईन, मुंबई

आयुर्वेदिक डॉक्टर असताना बेकायदेशीररीत्या एम. एस, एम.डी डॉक्टरचे काम करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉ. सविता चव्हाण हिला एफडीएने अखेर दणका दिला. डॉ. चव्हाण हिने विक्रोळीत रुबी डायग्नॉस्टिक सेंटर खोलून मनमानीपणे गोरखधंदाच चालवला होता. एफडीएने बुधवारी रात्री या सेंटरवर मारलेल्या छाप्यात गर्भपातासाठी लागणाऱ्या एमटीपी किटसह अन्य औषधांचा साठा तसेच तेथे दोन गर्भवती महिला सापडल्याने खळबड उडाली आहे.

विक्रोळीच्या रुबी डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा अवैध साठा असून आयुर्वेदिक महिला डॉक्टर एम.डी डॉक्टरचे काम करीत असल्याची गोपनीय माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना मिळाली. त्यानुसार डॉ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माधुरी पवार, शीतल देशमुख यांच्यासह दातेवार व जाधव या पथकाने बुधवारी रात्री रुग्बी डायग्नॉस्टिक सेंटरवर छापा मारला. त्यावेळी सेंटरमध्ये ११ नव्या एमटीपी किट आणि १५ वापरलेल्या एमटीपी किटस्चा साठा सापडला. शिवाय सेंटरमध्ये शेडय़ूल एच-१ मधील ७० हजार रुपये किमतीचा अन्य औषधसाठादेखील सापडला असून त्या औषधांची खरेदी-विक्रीची बिले मिळाली नाही. त्यामुळे डॉ. सविता चव्हाण हिच्या विरोधात विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.

एमडी (आयुर्वेदिक), गायनॅक म्हणून डॉ. सविता चव्हाण ही सेंटरमध्ये काम करीत होती. छापा मारला तेव्हा सेंटरमध्ये चार रुग्ण दाखल होते. त्यात दोन गर्भवती महिला होत्या. एमटीपी किटस् आणि अन्य औषधांचा बेकायदा साठा सापडल्याने डॉ. चव्हाण हिने गर्भपात केल्याचा संशय असून याप्रकरणी कसून तपास करणार असल्याचे डॉ. कांबळे म्हणाले.

सांगली, हिंगोलीनंतर मुंबईत
सांगली व हिंगोली येथे धडक कारवाई केल्यानंतर एफडीएने आता गर्भपाताचा काळाबाजार करणाऱ्या मुंबईतील डायग्नॉस्टिक सेंटरला दणका दिला. डॉ. चव्हाण हिच्या रुबी डायग्नॉस्टिक सेंटरचा परवाना रद्द करावा अशी सूचना पालिकेला करणार असून सेंटरमध्ये शस्त्रक्रिया केल्या जात होत्या का तसेच यासाठी डॉ. सविता कुठल्या डॉक्टरची मदत घेत होती का याचाही शोध घेणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले.