भुताच्या भीतीने ‘येथे’ पुरुष घालतात महिलांचे कपडे

सामना ऑनलाईन । बँकॉक

थायलंडमध्ये एक चकीत करणारा आणि तितकाच बुचकळ्यात टाकणारा प्रकार समोर आला आहे. येथील नाखोन फेनम प्रांतातील एका गावामध्ये भुताच्या भीतीने पुरुषांनी महिलांचे कपडे घालण्यास सुरुवात केली आहे. डेलीमेलने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

वृत्तानुसार, या गावातील पुरूष एका विधवा महिलेच्या भुतामुळे महिलांचे कपडे घालत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गावातील धडधाकट लोकांचा झोपेमध्येच मृत्यू झाला होता. या सर्वांच्या मृत्यूला गावकऱ्यांनी विधवा महिलेच्या भुताला जबाबदार धरले आहे. गावकऱ्यांच्या मते हे भूत गावातील धडधाकट पुरुष आणि तरुणांचा बळी घेत आहे. त्यामुळे गावातील महिलांनी आपल्या पतीला आणि मुलांना वाचवण्यासाठी त्यांना महिलांचे कपडे घालण्यास सुरुवात केली होती. असे केल्याने विधवा महिलेच्या भुताला गुंगारा देता येईल असे गावातील महिलांचे म्हणणे आहे.

भुतापासून वाचण्यासाठी गावकऱ्यांनी एक मोठा बाहुला बनवला आहे. गावातील मुख्य रस्त्यावर हा बाहुला ठेवण्यात आला असून बाहुल्याच्या गुप्तांगावर ‘या गावात एकही पुरुष नाही’, असे लिहिण्यात आले आहे. असे केल्यानंतर या गावात एकाही पुरुषाचा मृत्यू झाला नाही असे गावातील ५३ वर्षीय जॉनी यांनी सांगितले आहे. मात्र झोपेमध्ये लोकांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच हा सर्व प्रकार अंधश्रद्धा असल्याचेही काही गावकऱ्यांनी म्हटले आहे.