विज्ञानगाव

शिल्पा सुर्वे,[email protected]

महाराष्ट्रातील पहिले विज्ञानगाव कल्याणेहोळ गावातील मुलांनी उभी केलेली संकल्पना…

नोबेल पुरस्कार म्हणजे संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. हा पुरस्कार मिळवण्यात आपण खूपच मागे आहोत. एकीकडे अमेरिकेकडे ३७० पेक्षा अधिक नोबेल विजेते असताना हिंदुस्थानकडे अवघे ११ नोबेल विजेते आहेत. ही आकडेवारी निश्चितच भूषणावह नाही. २०१४ साली कैलास सत्यार्थी यांना नोबेल मिळाले. त्याचवेळी जळगाव जिल्हा, धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ गावात पाटलांच्या घरात ‘मिशन नोबेल प्राईज’ आकाराला येऊ लागलं. नोबेल पुरस्काराविषयी मुलांच्या मनात आताच कुतूहुलाचे बीज पेरलं तर भविष्यात विजेत्यांची संख्या निश्चितच वाढेल, हा विचार जयदीप पाटील या युवकाच्या मनात आला. त्यातून कल्याणेहोळ गाव हे विज्ञानगावाचे रोल मॉडेल म्हणून उभे राहिले. विज्ञानाला वाहिलेले  हे आपल्या राज्यातील पहिलंवहिलं गाव!

भिलारला असलेल्या पुस्तकाच्या गावाप्रमाणे कल्याणेहोळ विज्ञानगावही चांगलेच चर्चेत आलंय. पुस्तकाचे गाव ही पूर्णपणे सरकारची संकल्पना होती. मात्र विज्ञानगाव हे तरुण गावकऱयांनी आणि सामाजिक संस्थांनी उभा केलेला प्रकल्प आहे. प्रत्येक गोष्ट सरकारने, प्रशासनाने केली पाहिजे, हा विचारच इथे नाही. ग्रामपंचायत कल्याणेहोळ, सरपंच कल्पिता पाटील, नोबेल फाऊंडेशन, सावली फाऊंडेशन आणि दीपस्तंभ ग्रामीण शिक्षण क्रांतीकेंद्र यांच्या संयुक्त प्रकल्पातून हा प्रकल्प आकाराला आलाय. त्याला स्वर्गीय राजारामदादा पाटील प्रतिष्ठानची आर्थिक मदत मिळत आहे. देशातील नोबेल पुरस्कार विजेत्याची नावे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत वाढावीत ही नोबेल फाऊंडेशनच्या जयदीप पाटील यांची तळमळ. त्यासाठी ते निरनिराळे प्रयोग करून पंचक्रोशीतील मुले, महिला आणि शेतकऱयांपर्यंत पोचले आहेत. जयदीप यांनी नोबेल प्राईज चळवळी अंतर्गत आतापर्यंत ४५० पेक्षा अधिक परिसंवाद शाळा आणि कॉलेजांमध्ये घेतले आहेत. नोबेल पुरस्काराची माहिती देणारे पत्रक शाळाशाळांपर्यंत पोचवली आहेत. तब्बल तीन लाख मुलांचे प्रबोधन केलेय. मात्र तीन वर्षे घेतलेल्या कार्यशाळांतून आपला हेतू साध्य होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी विज्ञानगाव उभारायचं ठरवलं.

कल्याणेहोळे गाव तसे आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध आहे. गावांमध्ये परंपराचे जतन होतं. एकोपा नांदतो. उत्तर महाराष्ट्रातील पहिली संगणीकृत आणि वातानुकूलित ग्रामपंचायत असणारे गाव असा गावाचा लौकीक आहे. जयदीप यांनी १५ ऑगस्ट २०१७ ग्रामसभेत विज्ञानगावाची संकल्पना मांडली आणि सर्व गावकऱयांनी ती उचलून धरली. सारा गाव कामाला लागला. अल्पावधीतच गावात डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम बाल विज्ञान संस्कार केंद्र सुरू झाले. दर रविवारी संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत पंचक्रोशीतील सर्व मुले केंद्रात एकत्र येतात.

विजखांबांना, झाडांना शास्त्रज्ञांची नावे

विज्ञानगावात पोचताच विजेच्या खांबावर लावलेले शास्त्रज्ञांचे फोटो आणि शास्त्रज्ञांची माहिती वाचायला मिळते. डॉ. जगदीशचंद्र बोस, अल्बर्ट आईनस्टाईन, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. सी. व्ही. रामन आदी शास्त्रज्ञांची नावे विजेच्या खांबांना दिली आहेत. गावात ४९ प्रकारची शेकडो झाडे आहेत. प्रत्येक झाडाला गावातील त्याचे बॉटनिकल नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता गावातील चौथी-पाचवीतील मुलगाही झाडांची बॉटनिकल नावे सांगू शकतो.

ग्रामीण भागातील मुलांकडेही प्रचंड क्षमता आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे. खेडोपाडी विज्ञानगावासारखे प्रकल्प उभे राहिले तर देशात शास्त्रज्ञाच्या पिढय़ा घडतील. ग्रामीण समस्यांवर विज्ञानाकडे उत्तर आहे. फक्त काम करणे गरजे आहे. आपल्याकडे नोबेल विषयी मुलांना माहिती नाही. पालकांची मानसिकता नाही. विज्ञानावर आधारित शिक्षण आहे. मात्र वैज्ञानिक तयार होत नाही. युनोच्या एका अहवालानुसार हिंदुस्थानची शिक्षणपद्धती पाश्चात्य देशांच्या तुलनेत ५० वर्षे मागे आहे. चांगली शिक्षण पद्धत यायला २०७५ वर्ष उजाडेल. पायाभूत काम केल्याशिवाय गोष्टी बदलता येणार नाही. त्यासाठी विज्ञानगावाचे रोड मॉडेल उभं केलंय. असं नोबेल फाउंडेशन, संचालक दीपस्तंभ फाउंडेशनचे जयदीप पाटील यांनी म्हटलय.