सप्तशृंगी गडावरील बेकायदेशीर व्यापारी संकुल, लॉजिंग तत्काळ बंद करा, ग्रामस्थांची मागणी


सामना ऑनलाईन । कळवण

सप्तशृंगी गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली (रोपवे ) परिसरात बेकायदेशीर बांधकाम केलेले व्यापारी संकुल व लॉजिंग तत्काळ बंद करावे व ट्रॉलीचा वेळ ठरवून द्यावा अशी मागणी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे सप्तशृंगी गड येथील व्यावसायिक व ग्रामस्थांनी केली आहे.

सप्तशृंगी गड येथील व्यावसायिक व ग्रामस्थांनी तहसीलदार चावडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सप्तशृंगी गड येथे सुयोग गुरुबक्षाणी फ्युनिक्युलर ट्रॉली (रोप वे) कंपनीने खासगी तत्त्वावर सुरू करण्यासाठी परवानगी मागितली असता सप्तशृंगी गड ग्रामस्थांनी ग्रामसभेत विरोध केला होता. ट्रॉली सुरू झाल्यास येथील डोलीवाले, छोटे-मोठे व्यावसायिक व ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ येईल.

ग्रामस्थ व अधिकारी यांच्या समन्वयाची बैठक झाली असता फक्त भाविकांना मंदिरात ने-आण करण्यासाठी ट्रॉलीसाठी परवानगी दिली होती, मात्र वरिष्ठ अधिकाऱयांनी ग्रामस्थांना कुठलीही पूर्वसूचना न देता अधिकारांचा गैरवापर करून 23 जून 2009 रोजी भक्तांगण हॉलमध्ये ग्रामसभा घेऊन त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार ठराव तयार करून फ्युनिक्युलर ट्रॉली (रोप वे) कंपनीच्या कामात बेकायदेशीर बांधकाम परवानगी दिली आहे. त्यावेळी प्रोसिडिंगवरील सूचक अनुमोदकदेखील मीटिंगला हजर नव्हते. त्यामुळे या बेकायदेशीर व्यापारी संकुल व लॉजिंगमुळे भाविक ट्रॉलीपासूनच परत जात आहे. गावात येणाऱया भाविकांच्या संख्येत कमालीची घट आल्याने येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रासह देशात आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करीत होते, मात्र यापुढे सप्तशृंगी गडावरील व्यावसायिक व ग्रामस्थही आत्महत्या करतील, असा इशारा निवेदनात दिला आहे.