भगवानबाबांच्या स्मारकामुळे धनंजय मुंडेंची पोटदुखी!

सामना प्रतिनिधी । बीड

पाटोदा येथे झालेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी ‘प्रति भगवान गड उभारणे योग्य आहे का?’ असा सवाल करून राष्ट्रसंत भगवानबाबांच्या भक्तांना दुखावले आहे. भगवानबाबांचे भव्य स्मारक उभारण्यात येत असलेल्या सावरगाव घाटवासियांच्या भावना धनंजय मुंडे यांच्या वक्क्तव्याने दुखावल्या गेल्या असल्याने ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळी साकारत असलेल्या भव्य दिव्य स्मारकामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची पोटदुखी वाढली आहे. त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे व भगवान गडाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सावरगाव घाटच्या ग्रामस्थांसह भगवानबाबांचे अनुयायी संतापले आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व समाज बांधवांच्या भावनांचा आदर करून सावरगाव घाट येथे भगवानबाबा स्मारकाच्या उभारणीचे कार्य हाती घेतले आहे आणि यासाठी ऊसतोड कामगारांसह दऱ्याडोंगरातील अठरापगड जाती व संतश्रेष्ठ भगवानबाबांचे अनुयायी त्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे आहेत.

सावरगाव वासियांनी भगवानगडावर जमणाऱ्या समाजशक्तीला उधळवण्याचे कारस्थान हाणून पाडत दसरा मेळावा जन्मगांवी घेण्याचे आमंत्रण पंकजांना दिले होते. सावरगाव हे भगवान बाबांचे जन्मगाव आहे. तेथील स्मारकाचा विकास पाहून जर कोणाच्या पायाखालची माती सरकली तर त्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. पंकजा स्वतःच्या वडिलांचे गोपीनाथगड येथे स्मारक बांधून सावरगाव येथे भगवान बाबांचे स्मारक बांधत आहेत. म्हणजे भक्तीस्थान आणि पितृस्थान दोघांचाही त्यांनी सन्मान केला आहे.’भगवानगडाचा विकास करु द्या, दोन पाऊल मी मागं घेते’ असे आवाहन पंकजाताईंनी महंतांना करुन देखील त्यांचा दुराग्रह कोंडी वाढवणारा ठरल्याने सावरगाव घाट येथे दरवर्षी दसरा मेळावा व्हावा, अशी ग्रामस्थांची भावना आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

फितुरीच्या राजकारणासाठी धनंजय मुंडे यांनी भगवानगडाला गालबोट लावले असून तोच प्रकार सावरगाव घाट येथील राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या भव्य स्मारकाबद्दल खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सावरगांवचे सरपंच रामचंद्र सानप, युवा कार्यकर्ते संदेश सानप, उपसरपंच इंदर सानप, नारायण सानप, राजेंद्र खाडे आदींसह असंख्य ग्रामस्थांनी दिला आहे.