चाळ संस्कृतीच्या रंगरेषा

शिल्पा सुर्वे,[email protected]

मुंबईतील अस्तंगत होत जाणारी चाळ संस्कृती विनय गावडे याच्या रेषांतून सजीव होते आहे.

 चाळ हा शब्द मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा. चाळ या विषयावर किती बोलू, लिहू तितकं कमी. निम्न मध्यमवर्गीयांच्या सुखदुःखाचा गिलावा चढलेल्या चाळी म्हणजे गिरणगावचे धडधडते हृदय. मुंबईचे जीवन दाखवताना त्यांना वगळून पुढे जाता येत नाही.

विनय गावडे हा चिंचपोकळी येथे राहणारा म्हणजे पक्का गिरणगावकर. चाळीमध्ये जन्मलेला आणि वाढलेला. वास्तूची अंर्तबाह्य जाण असलेला. चाळीच्या बाहेर उभे राहून अगदी दुरून चाळीचे चित्र काढणाऱयातील नव्हे. विनयने तर चाळ जवळून पाहिलेली, ती  अनुभवलेली, तिथल्या माणसांचे स्वभाववैशिष्टय़ बघितलेले…या अनुभवाला त्याच्यातील चित्रकाराची दृष्टी लाभली आणि कॅन्व्हासवर चाळसंस्कृतीच्या रंगरेषा उमटल्या. दररोज चाळीच्या व्हरांडय़ात उभे राहून जे नजरेला दिसते, ते विनयच्या कुंचल्यातून अत्यंत अद्भुतरीत्या  चित्रांच्या रूपात उतरू लागले. रोजच्याच जगण्यातील गोष्टी, पण किती विविध रंगछटा लावून आपल्यासमोर येतात. दोरीवर वाळत घातलेले कपडे, निळ्या रंगाचा पाण्याचा ड्रम, जुनाट सायकल, त्यावर ठेवलेले गाठोडे, मळकट रंग उडालेले लाकडी खांब, त्यावर टांगलेली सुकलेल्या हारांची पिशवी, पाण्याची तोटी, टमरेल… अशा लहानसहान गोष्टींतून चाळकऱयांचे जीवन चित्रांत प्रतिबिंबीत झालेय. भर दुपारी उन्हाची किरणे व्हरांडय़ात पडतात, शांत दुपार कॅन्व्हासवर उतरलेली दिसते. कधी सकाळची गडबड दिसून येते. ऑइल ऑन कॅन्व्हास प्रकारातील या चित्रांमध्ये दिवसाची ही प्रहरं ब्रशच्या फटकाऱयाने विनय यांनी अक्षरशः जिवंत केलेय. चित्रांची ही भाषा थेट हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही.

विनय यांनी काढलेल्या चित्रांमध्ये इंडिया युनायटेड मिलचा गेट नंबर ४, तसेच घराची तुटलेली खिडकी अशी काही चित्रे लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही. या चित्रांविषयी विनय सांगतात, आता पूर्वीसारखे दिवस नाहीत. घरे लहान असतात, दोन -तीन भावंडांचे संसार त्यात कसे उभे राहणार? जागेला पैसा येतो म्हटल्यावर चाळीत राहणारा माणूस संधी मिळाली की जागा सोडून दुसऱया ठिकाणी राहायला जातो. नव्या सामाजिक स्तरावर चाळीत राहणे कमीपणाचे, गैरसोयीचे वाटू लागते. गिरण्यांचे रूपडे पालटले. त्याजागी चकचकीत उद्योग उभे राहिले. चाळींच्या जागी उत्तुंग टॉवर्स उभे राहिले. ब्लॉक सिस्टीममध्ये एसी बसले आणि एसी सुरू करताना घरांची दारेखिडक्या बंद झाली. माणसं  दुरावली. चित्रात दिसणारी तुटलेली खिडकी असे बरेच काही सांगून जाते.

येत्या जानेवारीदरम्यान दादर येथील स्वामी समर्थांच्या मठात त्यांचे पहिले सोलो प्रदर्शन होणार आहे. ही पूर्णपणे स्वामी चित्रांवरील मालिका असेल.

विनय गावडे यांच्यासारख्या कलावंतांनी चाळीतून इमारतीमध्ये जाऊनही चाळीची असलेली नाळ तुटू दिलेली नाही. चाळसंस्कृतीच्या गडद छटांनी त्यांचे आयुष्य समृद्ध केले आहे. याच कृतज्ञतेच्या जाणिवेतून ते चाळीला सोबत घेऊन पुढे जात आहेत. चाळजीवनाचा रंगरेषा मिटल्या जाणार नाहीत, याची हमी देत आहेत.