वेदनारहित मृत्युदंड

>>विनायक रामचंद्र वीरकर<<

केंद्र सरकारने बारा वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याचे ठरवले आहे, तसेच बारा वर्षांवरील मुलींवर बलात्कार व खून करणाऱ्या गुन्हेगारांना दहा ते २० वर्षे सक्तमजुरी अथवा जन्मठेप अमलात आणण्याचे ठरवले आहे. हा निर्णय अतिशय योग्य आहे. त्याबद्दल मी हिंदुस्थान सरकारचे अभिनंदन करत आहे, परंतु या शिक्षेमध्ये मी खालील सुधारणा सुचवत आहे. फाशीच्या शिक्षेऐवजी वेदनारहित मृत्युदंडांची, जीवदानयुक्त पद्धत सुचवत आहे. प्रथम मृत्युदंड झालेल्या कैद्याला वेदनारहित जनरल अनेस्थेशिया (भूल) देण्याचे इंजेक्शन द्यावे व कैदी बेशुद्ध झाल्यावर त्याचे दोन डोळे, दोन किडन्या, लिव्हर (यकृत) स्वादुपिंड, फुप्फुस, हृदय, मेंदू व त्वचा वगैरे महत्त्वाचे अवयव काढून आजारी रुग्णांना बसवावेत. (ट्रान्सप्लांट करावेत.) यामुळे कैद्याला वेदनारहित शांततामय मृत्यू येईल तसेच दोन अंधांना दृष्टी मिळेल व इतर अवयवांमुळे सहा ते सात जणांचे प्राण वाचून त्यांना जीवदान मिळेल. अवयव दानातून मिळणाऱ्या पैशांतून दहा टक्के रक्कम पीडित मुलीला द्यावेत व उरलेली नव्वद टक्के रक्कम सरकारी (तुरुंग) खर्चासाठी सरकार जमा करावी. दहा ते २० वर्षे सक्तमजुरी अथवा जन्मठेप झालेल्या गुन्हेगारांना करदात्यांच्या पैशांतून सरकारने काय म्हणून पोसायचे? कोणत्याही परिस्थितीत आम्हा करदात्यांचा पैसा गुन्हेगार पोसण्यासाठी वापरू नये. तसेच त्यांची प्रॉपर्टी जप्त करावी (शक्य असेल तिथे) कारण ५० ते ६० टक्के गुन्हेगार पैशाच्या जोरावर बलात्कार व खून करतात असे आढळून आले आहे. इतर गुन्हेगारांना (चोर, दरोडेखोर, खंडणीबहाद्दर, हुंडाबळी, भ्रष्टाचारी, भेसळदार, अमली पदार्थ वगैरे) जरब बसवण्यासाठी अंदमानला (५०० बेटे आहेत) नवीन तुरुंग बांधून परत काळय़ा पाण्याची शिक्षा सुरू करावी. अंदमान बेटांतून गुन्हेगार पळून जाऊ शकणार नाहीत. त्यांना बाहेर सहजरीत्या संपर्क साधता येणार नाही. तुरुंगात कोणत्याही अवास्तव सुविधा मिळणार नाहीत. सरकारने याबाबतीत ब्रिटिश सरकारचा सल्ला जरूर घ्यावा.