मुंबई-गोवा महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करा!

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांमुळे महामार्गाची अतिशय भीषण अवस्था झाली आहे. खड्डय़ांमुळे महामार्गावर दररोज अपघात होत आहेत. या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ करण्यात यावे अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आज नवी दिल्ली येथे एका निवेदनाद्वारे केली.

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांमुळे जनतेला त्रास होत असून त्याविरोधात शिवसेनेने आवाज उठवला आहे. शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन दिले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली. खेड-परशुराम घाट – चिपळूण – संगमेश्वर – रत्नागिरीदरम्यानच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला अतिशय अडथळे होत आहेत. कणकवलीपासून झारापपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

पावसाळय़ात महामार्गावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले. गणेशोत्सवापासून या खड्डय़ांची अवस्था जैसे थे आहे. महामार्गावरील खड्डय़ांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून अपघातांचे प्रमाणही वाढले असल्यामुळे तत्काळ महामार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे अशी मागणी शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाने महामार्गाची दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना ठेकेदारांना दिल्या असल्या तरी ठेकेदार कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्यातील वादामुळेच महामार्गावरील खड्डे जागेवरच आहेत. खड्डे कोणी भरायचे आणि दुरुस्ती कोणी करायची हा प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांमधील वाद मिटवून जनतेच्या सेवेसाठी तत्काळ योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे असे मत खासदार विनायक राऊत यांनी आपल्या निवेदनात मांडले आहे.