विनोद कांबळी पडला सचिनच्या पाया…

सामना ऑनलाईन । मुंबई

गेली काही वर्ष एकमेकांपासून दूर असलेले सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री पुन्हा फुलू लागली आहे. मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या पारितोषिक सोहळ्यात सचिन आणि विनोद कांबळी समोरासमोर आले होते. ट्रायम्फ नाईट्सनं शिवाजी पार्क लायन्सवर तीन धावांनी सनसनाटी मात करुन, मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगचं पहिलं जेतेपद पटकावलं.

शिवाजी पार्क लायन्स या उपविजेत्या संघाचा विनोद कांबळी मार्गदर्शक आहे. व्यासपीठावर सचिनकडून पुरस्कार स्वीकारताना विनोद कांबळीने वाकून त्याला नमस्कार केला. सचिनने पटकन विनोद कांबळीला उठवून गळाभेट घेतली. हा सगळा प्रकार सुरू असताना सुनील गावसकरही उपस्थित होते.

विनोद कांबळीने २००९मध्ये एका टीव्ही शोमध्ये सचिने मला मदत न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कांबळीने सांगितलं होतं की, ‘आमच्यात सर्व काही ठीक आहे. यासाठी मी आनंदी आहे. आम्ही एकमेकांची गळाभेट घेतली आणि गप्पाही मारल्या. आता या दोन मित्रामध्ये सारे काही ‘ऑल इज वेल’ असल्याचा प्रत्यय गुरुवारी सर्वांना आला आहे.