‘कॉलेज बंद करू नका’ विनवणारे मेसेज थांबले नाहीत तर, पॉलिटेक्निक बंद करेन – तावडे

शिक्षणमंत्र्यांच्या धमकीचा विद्यार्थी-शिक्षक संघटनांकडून तीव्र निषेध

सामना ऑनलाईन, मुंबई – सोलापूर तंत्रनिकेतन बंद करू नका या मागणीसाठी मेसेज पाठवणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट ‘मेसेज थांबले नाहीत तर सोलापूर पॉलिटेक्निक बंद करेन, पोलिसात तक्रार करेन’ अशी धमकी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याची धक्कादायक बातमी आज सोशल मीडियावर व्हायरल झाली. शिक्षणमंत्र्यांच्या या अरेरावीचा विद्यार्थी-शिक्षक संघटनांकडून जोरदार निषेध केला जात आहे.

सोलापूर पॉलिटेक्निक बंद करण्याच्या बातमीमुळे या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ६०० विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी पॉलिटेक्निक बंद करू नका अशी मागणी करीत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांकडून शिक्षणमंत्र्यांना ‘कॉलेज बंद करू नका’ असे मेसेज पाठवले जात आहेत. या विद्यार्थ्यांना धीर देण्याची आवश्यकता असताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून मात्र विद्यार्थ्यांना धमकावले जात आहे. शिक्षणमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीत आधार देण्याची आणि धीर देण्याची गरज असताना फोनवरून धमकी देण्याचा प्रकार असंवेदनशील असल्याचा आरोप युवा सेनेचे साईनाथ दुर्गे यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार असताना, ग्रामीण भागात आणखी महाविद्यालये सुरू करणे असताना शिक्षणमंत्र्यांकडून सुरू असलेली अरेरावी निषेधार्ह असल्याचे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.

राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन अपग्रेड करण्यात येत आहेत. त्यामुळे कुठलेही पॉलिटेक्निक बंद होणार नाही अशी माहिती अधिवेशनात देण्यात आली. सोलापूर पॉलिटेक्निक बंद होईल अशी कोणतीही वस्तुस्थिती नाही. मात्र एफएसआय या कम्युनिस्टप्रणीत संघटनेने मला जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ८०० ते १२०० एसएमएस पाठवले आहेत. विद्यार्थ्यांना भडकवण्याचे काम केले जात आहे. – विनोद तावडे, शिक्षणमंत्री

काय म्हणाले शिक्षणमंत्री

विद्यार्थ्यांनी ‘आमचे कॉलेज बंद करू नका’ असा मेसेज पाठवल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे या विद्यार्थ्याला फोन करून म्हणाले की, ‘हे मेसेज संध्याकाळपर्यंत बंद झाले नाही तर मी सायंकाळी कॉलेज बंद करीत असल्याचे जाहीर करेन. मी मूर्ख माणूस आहे. मी उलटाच निर्णय घेईन. याबाबत विद्यार्थ्यांनी मेसेज पाठवून टॉर्चर केल्यामुळे पोलिसांत तक्रारही करेन, असेही तावडे म्हणाले आहेत. यावर माफी मागणाऱ्या विद्यार्थ्यालाही ‘नुसते सॉरी म्हणू नको, लेखी माफी माग’ असे सांगितले.