विराट चॅलेंज..! कोहलीचा हा विक्रम कोणीच मोडू शकत नाही

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली आपल्या कारकीर्दीतील सर्वोच्च फॉर्मात आहे. गेल्या काही वर्षात विराटने अनेक विक्रम पादाक्रांत केले. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विजय मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी टीम इंडियाने विराटच्या नेतृत्वाखाली केली. तसेच एक दिवसीय मालिकेतही विराटने अॅडलेडमध्ये शतक ठोकले आणि विक्रमांची रास रचली.

कसोटी आणि एक दिवसीय क्रमवारीत नंबर एकवर असलेल्या विराटचा एक असाही विक्रम आहे जो मोडीत काढणे आव्हानात्मक आहे. कदाचीत त्याचा हा विक्रम येणाऱ्या काळात कोणी मोडू शकेल की नाही याबाबतही शंका आहे. विराटने सलग तीन वर्ष एकाच तारखेला शतक ठोकण्याची कामगिरी करत अजब योगायोग साधला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या तीनपैकी दोन शतकांवेळी टीम इंडियाला विजयश्री मिळाली. पाहुया नक्की काय आहे हा योगायोग…

15 जानेवारी, 2017 (इंग्लंडविरुद्ध एक दिवसीय सामना)
पुण्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या या सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी 351 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करतान विराट कोहलीने 105 चेंडूत आठ चौकार आणि पाच षटकारांसह 122 धावांची खेळी करत टीम इंडियाला 11 चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला. विराटसह केदार जाधवन 76 चेंडूत 120 धावांची वादळी खेली केली होती.

15 जानेवारी, 2018 (ऑफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना)
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सेंच्यूरियनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात 15 जानेवारीला विराटने 217 चेंडूत 15 चौकारांसह 153 धावांची खेळी केली होती. विराटच्या शतकानंतर इतर फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला हा सामना 135 धावांनी गमवावा लागला होता.

15 जानेवारी, 2019 (ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एक दिवसीय सामना)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड येथे रंगला. या सामन्यात विराट कोहलीने 112 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 104 धावा ठोकल्या. विराटच्या या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने सहा विकेटने हा सामना जिंकला.