#IPL2019 विराट कोहलीचे आयपीएलमधील पाचवे शतक

3

सामना ऑनलाईन । कोलकाता

कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने दणदणीत शतक ठोकले आहे. आयपीएलच्या कारकिर्दीतले विराटचे हे पाचवे शतक आहे. तब्बल तीन वर्षांनंतर विराटने आयपीएलमध्ये शतक ठोकले आहे. विराटने 57 चेंडूत 100 धावा ठोकल्या. बंगळुरूच्या डावातील तो अखेरच्या चेंडूवर बाद झाला.

विराट कोहलीने आयपीएल कारकीर्दीमध्ये आतापर्यंत पाच शतकं ठोकली आहेत. 2016 मध्ये आयपीएलच्या एकाच मोसमामध्ये विराटने चार शतकं ठोकण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर झालेल्या 2017 आणि 2018 च्या आयपीएलमध्ये विराट शतकापासून वंचित राहिला होता. अखेर तीन वर्षानंतर हा दुष्काळ संपवत विराटने कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर शतक ठोकले.

कोलकाताविरुद्धच्या शतकी खेळीच्या जोरावर विराटने आयपीएल कारकीर्दीतील 5 हजार धावा देखील पूर्ण केल्या. सुरेश रैनानंतर अशी कामगिरी करणारा तो फक्त दुसरा खेळाडू आहे. तसेच आयपीएल 2019 मधील 300 धावा देखील विराटने पूर्ण केल्या. विराटने आतापर्यंत आयपीएलच्या 10 मोसमात 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. फक्त 2008 ला 165 आणि 2009 ला 264 धावा विराटने केल्या होत्या. एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील विराटच्या नावावर आहे. 2016 ला विराटने चार शतकांसह 973 धावा चोपल्या होत्या.