लढणार, भिडणार आणि चषक आणणारच – ‘विराट’ दावा

7

सामना प्रतिनिधी । मुंबई

इंग्लंडमध्ये होत असलेला यंदाचा वर्ल्ड कप आमच्यासाठी सर्वात आव्हानात्मक आहे. या स्पर्धेत कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. कमकुवत वाटणारा संघही दिग्गज संघाला पराभूत करीत स्पर्धेत उलटफेर करू शकतो, पण आम्ही लढणार, भिडणार आणि जिद्दीने चषक आणणारच, असा दावा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने इंग्लंडला प्रयाण करण्यापूर्वी मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला.

इंग्लंडमधील खेळपट्टय़ा, हवामान याचा विचार करण्यापेक्षा कोणत्याही दबावाशिवाय विश्वचषक लढतींसाठी आपण मैदानात उतरायला हवं, या मताचा मी आहे. आमच्यासाठी जमेची बाजू म्हणजे आमचे गोलंदाज एकदम ‘फिट’ आहेत. पूर्वतयारीसाठी आयपीएल स्पर्धा फारच उपयुक्त ठरली. 50 षटके पूर्ण क्षमतेने टाकण्यासाठी ते सज्ज आहेत, असे कोहली म्हणाला. संघाच्या कामगिरीबरोबरच माझी वैयक्तिक कामगिरीही तितकीच महत्त्वाची असून मला त्याची पूर्ण कल्पना असल्याचे विराटने नमूद केले.

केवळ एका संघापुरती व्यूहरचना असू नये
वर्ल्ड कपमध्ये कोणता संघ सर्वात आव्हानात्मक आहे आणि एखादा संघ डोळ्यासमोर ठेवून काही व्यूहरचना केली आहे का, असे विचारले असता आपल्याला वर्ल्ड कप जिंकायचा आहे तर पूर्ण क्षमतेने खेळावं लागेल. एखाद्या संघाला मात देण्यापुरती आपली व्यूहरचना असू नये, असे मत कोहलीने व्यक्त केले.

…तर पुन्हा विश्वचषक उंचावू शकू
हिंदुस्थानी संघ स्पर्धेत पूर्ण क्षमतेने खेळल्यास निश्चितपणे आपण पुन्हा एकदा विश्वचषक उंचावू शकतो, असा विश्वास टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी व्यक्त केला. यंदा जेतेपदासाठी तीव्र स्पर्धा असणार आहे. 2015च्या तुलनेत या वेळी बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघही अधिक तुल्यबळ झाले आहेत. स्पर्धेची रचनाही आव्हानात्मक आहे. मात्र साखळीत 9 सामने खेळायचे असल्याने नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले.

धोनी संघासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरणार – रवी शास्त्री
हिंदुस्थानच्या खेळाडूंना यंदाच्या विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. तेथे कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो. वेस्ट इंडिज किंवा बांगला देश हे संघ 2015 ला जसे होते, त्यापेक्षा आता फारच वेगळे आणि आव्हानात्मक दिसत आहेत. अशा वेळी महेंद्रसिंग धोनी याची संघातील भूमिका महत्वाची असणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनी अत्यंत अनुभवी आहे. महत्वाच्या सामन्यांना कलाटणी देण्याचे काम अनेकदा त्याने केले आहे. धोनी यंदाच्या विश्वचषकात संघासाठी अतिमहत्वाचा खेळाडू ठरेल, असा विश्वास टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी व्यक्त केला.

आयपीएलमध्ये कामगिरी चांगली झाली नाही म्हणून निराश होऊ नका
इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळणे हे खूप वेगळे असणार आहे. आम्ही विश्वचषकात पूर्ण क्षमतेने खेळू. दबावातही आम्ही चांगली कामगिरी करू. किंबहुना ते आम्हाला करावेच लागेल. एकदिवसीय क्रिकेट सामने आणि टी 20 क्रिकेट यात खूप फरक आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये अपयशी झालेले आपले खेळाडू विश्वचषकात यश मिळवतील असा मला विश्वास आहे. ‘फिरकीवीर’ कुलदीप यादव अथवा युझवेंद्र चहलला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, हे चांगले झाले. कारण हे जर विश्वचषकात झाले असते तर सुधारणेला वाव नव्हता. पण आयपीएलमध्ये त्यांची कामगिरी खराब झाली म्हणून त्यांनी निराश होऊ नये. आता त्यांना नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा करायची हे समजले आहे. ते विश्वचषकात चांगली कामगिरी करतील, असे प्रतिपादन विराटने केले.

आपली प्रतिक्रिया द्या