हार्दिक पांड्या,के.एल.राहुलवर विराट कोहलीही नाराज झाला


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्यं केल्याप्रकरणी विराट कोहली याने स्पष्टीकरण दिलं आहे. जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांचं समर्थन होऊच शकत नाही, असं विराट कोहली याने स्पष्ट केलं आहे.

शनिवारपासून हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेची सुरुवात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहली याने या प्रकरणी आपलं मत मांडलं आहे. ‘अशा प्रकारची वक्तव्यं करणं अजिबात समर्थनीय नाही. हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या दृष्टिनेही ते योग्य नाही. या गोष्टीची कल्पना त्या दोन्ही खेळाडूंना आहे. या सगळ्या गोष्टींचं गांभीर्यही त्यांना कळलं आहे. अर्थात अशा प्रकारची विधानं ही वैयक्तिक पातळीवर असल्याने त्याचा थेट प्रभाव संघाच्या मनोबलावर आणि आत्मविश्वासावर होणार नाही. कारण, अशा गोष्टी या आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. अशा प्रकारचे प्रसंग अतिशय संयमाने आणि शांततेने हाताळावे लागतात, असं स्पष्टीकरण विराटने दिलं आहे.

पांड्या आणि राहुल येत्या मालिकेत सहभागी होणार का, या प्रश्नावर कोहली म्हणाला की, पांड्या आणि राहुल यांची उपस्थिती संपूर्णतः बीसीसीआयच्या निर्णयावर अवलंबून असेल. त्यांच्याविरोधात जी कारवाई होईल, त्यावर त्यांचा सहभाग ठरणार आहे. तसंच या गोष्टीमुळे आगामी एकदिवसीय मालिका तसेच काही महिन्यांवर येऊन ठेपलेला विश्वचषक यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही, असंही विराट कोहली याने स्पष्ट केलं आहे.