खेळाडूंच्या फलंदाजी क्रमाबाबत नंतर ठरवू, कर्णधार विराट कोहलीचे स्पष्ट मत

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी विजय शंकर हा वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करील असे विश्वासाने सांगितले खरे, पण कर्णधार विराट कोहलीला याबाबत विचारले असता तो म्हणाला, कोणता खेळाडू कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करील याबाबत नंतर ठरवू. दोन भिन्न विधानांवरून वर्ल्ड कपची निवड करताना निवड समिती व कर्णधार यांच्यामध्ये थोडेतरी खटके उडाले असतील याची प्रचीती येते.

गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही बऱयाच पर्यायांची चाचपणी केली, पण विजय शंकरची संघात एण्ट्री झाली आणि आम्हाला भिडू मिळाला. विजय शंकर फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबींमध्ये आपली चमक दाखवू शकतो. आतापर्यंत इतर संघांमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असायचा. आता हिंदुस्थानमध्ये अष्टपैलू खेळाडू तयार होत आहेत, असे विराट कोहली स्पष्टपणे पुढे म्हणाला.

धोनीचे असणे हे भाग्यच
महेंद्रसिंग धोनीला ‘लढत’ कोणत्या दिशेने सुरू आहे. हे ओळखता येते. यष्टय़ांच्या मागे राहून तो चाली रचतो. गोलंदाजांना मदत करतो. त्याच्यासारखा अनुभवी खेळाडू संघात असणे हे माझे भाग्यच, असे कौतुक विराट कोहलीने ‘माही’चे केले. धोनी सुरुवातीला माझ्या पाठीशी ठाम उभा राहिला होता हे मी कधीच विसरू शकत नाही. त्याने मला तिसऱया क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. काही सामन्यांनंतर तिसऱया क्रमांकासाठी अन्य खेळाडूंना आजमावून पाहण्याचा पर्याय त्याच्याकडे होता, पण त्यानं मला संधी दिली आणि मी ती साधली. त्यावेळी मला पाठिंबा मिळणे गरजेचे होते. बऱयाच युवा फलंदाजांना तिसऱया क्रमांकावर खेळण्याची संधी सहजासहजी मिळत नाही, अशी आठवणही कोहलीने सांगितली.