कोहलीला कशाची भीती वाटतेय? गांगुलीचे मोठे वक्तव्य

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट संघ शनिवारी आयर्लेंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. या दौऱ्यावर शानदार कामगिरी करण्याचा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला. याच संदर्भात हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराटबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. इंग्लंड दौऱ्याच्या तयारी करताना विराट कोहलीला थोडी भीती वाटत होती. चार वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये हिंदुस्थानचा संघ सपशेल अपयशी ठरला होता आणि त्याचमुळे विराटला भीती वाटत होती. म्हणून तो इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाण्याच्या तयारीमध्ये होता, असे गांगुलीला वाटते.

गांगुली म्हणाला, ‘कोहली एक जबरदस्त खेळाडू आहे आणि यावेळी इंग्लंड दौऱ्यावर तो चांगली कामगिरी करेल. विराटने इंग्लंड दौऱ्यापूर्वी काऊंटी क्रिकेटमध्ये सहभाग घेतला नाही ही आनंदाची गोष्ट आहे. मला असे वाटते की इंग्लंड दौऱ्यावर ४ वर्षापूर्वी जे काही घडले होते त्यामुळे विराट चिंतीत होता आणि त्यामुळे तो काऊंटी क्रिकेट खेळण्यास उत्सूक होता. परंतु काही कारणास्तव त्याला काऊंटी क्रिकेट खेळण्यास मिळाले नाही, हे चांगलेच झाले. त्यामुळे त्याला थोडी विश्रांती मिळाली आणि तो नव्या दमाने मैदानात उतरेल,’ असे गांगुली म्हणाले. तसेच यावेळी इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करत मागील अपयश धुण्याची संधी हिंदुस्थानकडे आहे, परंतु इंग्लंडचा संघही फॉर्मात आहे. त्यामुळे ही मालिका धमाकेदार होणार आहे, असेही गांगुली म्हणाला.

बदलत्या क्रिकेटवर व्यक्त केली चिंता

गांगुलीने बदलत्या क्रिकेटवर चिंता व्यक्त केली आहे. यावेळी गांगुलीने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामन्याचा उल्लेख केला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात ४८१ धावांचा डोंगर उभारला. एक दिवसीय क्रिकेटमधील ही एका संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. यानंतर सचिन तेंडुलकरने नकारात्मक प्रतिक्रिया देताना एक दिवसीय क्रिकेटमध्ये दोन चेंडूचा वापर करणे म्हणजे ‘विध्वंसाला आमंत्रण’ असे म्हटले होते. सचिनला समर्थन देताना गांगुलीनेही दोन चेंडूच्या वापरावर चिंता व्यक्त केली. दोन चेंडूच्या वापरामुळे रिव्हर्स स्विंगची कला गायब होत आहे कारण रिव्हर्स स्विंगसाठी चेंडू आता जुना होत नाही.