पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचे दडपण नाही!: कोहली

सामना ऑनलाईन । बर्मिंगहॅम

पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळण्याचे दडपण मुळीच नाही. इतर लढतींप्रमाणेच ही एक लढत असे आम्ही मानतोय. मग रविवारच्या लढतीसाठी व्यूहरचना अथवा संघ बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे बाणेदार उत्तर देत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकारांच्या प्रश्नांच्या चेंडूवर सणसणीत स्ट्रेट ड्राइव्ह लगावला.
हिंदुस्थानी व पाकिस्तानी क्रिकेट शौकिनांसाठी रविवारची हिंदुस्थान-पाक चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल भले क्रिकेट युद्ध असेल पण आम्ही खेळाडू क्रिकेट लढत म्हणून या लढतीकडे पाहतो. यापूर्वी ब-याच वेळा पाकिस्तानशी फायनलमध्ये खेळलो आहोत आणि जिंकलोही आहे असे सांगून कोहली म्हणाला, समोर प्रतिस्पर्धी कोणताही संघ असो, सर्वोत्तम खेळ करून जिंकण्याला आमचे प्राधान्य असेल. माझा सहकारी फलंदाज व गोलंदाज यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते माझे आणि करोडो देशवासीयांचे चॅम्पियन्स ट्रॉफी दुस-यांदा जिंकण्याचे स्वप्न साकारतीलच असा आत्मविश्वासही कोहलीने व्यक्त केला.

बांगलादेशवरचा विजय हे सर्वोत्तम खेळाचे उदाहरण

उपांत्य लढतीत बांगलादेशवर ९ गडी राखून मिळवलेला विजय हे टीम इंडियाच्या सर्वोत्तम खेळाचे उदाहरण आहे. त्या विजयाने हिंदुस्थानची फलंदाजी किती मजबूत आहे हे दिसून आले. असे प्रतिपादनही विराटने केले.

केदार चतुर खेळाडू

अष्टपैलू केदार जाधव आमच्यासाठी सरप्राइज पॅकेज नाहीय तर तो चतुर क्रिकेटपटू आहे. केदारने चतुर गोलंदाजी करीत बांगलदेशला ३०० धावांचा टप्पा गाठण्यापासून रोखले. त्याला कोणत्या परिस्थितीत कशी गोलंदाजी करावी याची चांगली जाण आहे अशी स्तुतिसुमने विराटने केदार जाधववर उधळली.

क्रिकेटमध्ये फलंदाजीचा मनसोक्त आनंद घेण्याची भूमिका ठेवली की काहीच कठीण नसते. अपयशाला मागे टाकत पुढे जाण्याच्या भूमिकेमुळेच मी वन डेत वेगवान आठ हजार धावांचा पल्ला गाठलाय. धावा किती झाल्या यापेक्षा माझा खेळ किती बहरला याला मी अधिक महत्त्व देतो. – विराट कोहली