यजमान इंग्लंड संघ सर्वात धोकादायक; कर्णधार विराटचा संघसहकाऱ्यांना इशारा

149

सामना ऑनलाईन । लंडन

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियन संघाला 2019 च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असताना हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीने मात्र धक्कादायक मत मांडले आहे. मायदेशात इंग्लंड संघ अतिशय बलाढय़ आणि धोकादायक ठरू शकतो असा गर्भित इशाराच कर्णधार विराटने आपल्या हिंदुस्थानी संघसहकाऱ्यांना दिला आहे.

आयसीसी विश्वचषक 2019 साठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली. टीम इंडियाचे सगळे खेळाडू सध्या जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यान हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहली याने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. अनेक क्रिकेट जाणकार हिंदुस्थानी संघाला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानत असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा मात्र इंग्लंडचा संघ हा सर्वात बलाढय़ संघ असल्याचे सांगत आहे. इंग्लंडमध्ये सर्व संघाच्या कर्णधारांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्याने हे मत व्यक्त केले.

घरच्या वातावरणात इंग्लिश खेळाडू अधिक धोकादायक
यंदाची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा इंग्लंडमध्ये आहे. घरच्या वातावरणात इंग्लंडचे खेळाडू नक्कीच बहारदार खेळ करू शकतात. त्यामुळे इंग्लंडचा संघ हा यंदाच्या विश्वचषकात सगळय़ात बलाढय़ संघ ठरू शकतो, असे विराट म्हणाला. ‘इंग्लंडचा संघ गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीचा खेळ करत आहे त्यावरून तो संघ लवकरच 50 षटकांत 500 चा टप्पा गाठेल असे वाटते आहे. स्पर्धेत सहभागी अन्य काही संघ दमदार कामगिरी करू शकतील,’ असेही कोहलीने नमूद केले. यंदाची आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सर्वच मोठय़ा संघांसाठी अतिशय आव्हानात्मक ठरणार आहे. कारण बांगलादेश, अफगाणिस्तानसारखे संघही स्पर्धेत उलटफेर करू शकतात. त्यातच वेस्ट इंडीज संघ पुन्हा फॉर्मात आलाय.

कोहली म्हणतो, संघात डुप्लेसिस असायला हवा होता!
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि सलामीचा फलंदाज फाफ डुप्लेसिस हिंदुस्थानी संघात असता तर बरे झाले असते असे विधान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केले आहे. नुकतीच इंग्लंडमध्ये सर्व संघांच्या कर्णधारांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सर्व कर्णधारांना प्रतिस्पर्धी संघातला कोणता खेळाडू तुम्हाला तुमच्या संघात हवा आहे, असा काल्पनिक प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना विराटने फाफ डुप्लेसिसला आपली पसंती दर्शवली. अन्य कर्णधारांनीही अन्य संघांतील आपल्या आवडत्या खेळाडूंची मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या