प्रसिद्ध साहित्यिक विष्णू सूर्या वाघ यांचे निधन

सामना प्रतिनिधी । पणजी

ज्येष्ठ साहित्यिक आणि गोवा विधानसभेचे माजी उपसभापती विष्णू वाघ यांचे 8 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेत निधन झाले. वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी यासंदर्भातील माहिती केपटाउन येथून दिली आहे. वाघ हे ऑगस्ट 2016 पासून ब्रेनस्ट्रोकमुळे आजारी होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी व कोंकणी साहित्यिक विश्वाला व राजकीय क्षेत्रालाही धक्का बसला. ते 53 वर्षांचे होते.

वाघ हे 2012 मध्ये विधानसभा निवडणुकीत सांतआंद्रेमधून निवडून येऊन प्रथमच गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. उपसभापतीपदी असताना वाघ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यावेळपासून ते व्हिलचेअरला खिळून होते. वाघ यांच्या पत्नी अरुणा वाघ यांनी दिलेल्या माहिती नुसार दोन महिने वाघ हे दोनापावल येथील मणिपाल रुग्णालयात होते. ते वारंवार आजारी पडत असल्याने त्यांच्याच इच्छेनुसार केपटाऊन, जोहान्सबर्ग येथे त्यांना नेले होते. तिथे त्यांना आराम मिळाला होता; पण 8 तारखेला त्यांची प्राणज्योत मालवली. येत्या दोन दिवसांत त्यांचा मृतदेह गोव्यात आणून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.