देखाव्यांतून समाजप्रबोधन करणारं गणेशोत्सव मंडळ

रश्मी पाटकर, मुंबई

मुंबईचा गणेशोत्सव ही सगळ्या गणेशभक्तांसाठी एक पर्वणीच असते. वेगवेगळी मंडळे, त्यांच्या गणेशमूर्ती, रंगीबेरंगी देखावे, चलचित्रे यांची रेलचेल असलेला हा गणेशोत्सव सर्वार्थाने रम्य असतो. पण, दरवर्षागणिक वाढत जाणारी मंडळांची संख्या आणि मूर्तींची उंची ही पर्यावरणासाठी धोकादायक ठरतेय. त्यामुळे मूर्तींची उंची किती असावी, गणेशोत्सव जास्तीत जास्त निसर्गमय कसा करावा, याबाबत सगळीकडेच चर्चा सुरू असते. पण, मुंबईतल्या उपनगरामध्ये असंही एक गणेशोत्सव मंडळ आहे, ज्या मंडळाने उत्सवाचं मूळ रूप हरवू न देता, समाजकार्यातून आपली ओळख निर्माण केली आहे.

दहिसरचा राजा म्हटला जाणारा विठ्ठल मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती गेल्या ६८ वर्षांपासून समस्त दहिसरकरांसाठी अतिशय लाडका बनला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे लोकमान्यांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अतिशय निगुतीने जपत या मंडळाने अनेक समाजोपयोगी कार्यं केलेली आहेत. पण, हे सर्व करत असताना आपल्या मंडळाच्या गणपतीची मूर्ती ही कायम अडीच फूट उंचीची आणि संपूर्णपणे मातीची असेल याकडे मंडळाने विशेष लक्ष दिलं आहे. त्यामुळे मंडळ कितीही मोठं झालं तरीही मूर्ती ही कायम एकाच उंचीची आणि संपूर्णपणे पर्यावरणपूरक असेल याची काळजी विठ्ठलमंदिर गणेशोत्सव मंडळ आवर्जून घेतं. याचसोबत दरवर्षी आकर्षक देखावे किंवा एखाद्या विषयावर चलचित्र साकारत समाजप्रबोधनाचा वसा या मंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे मंडळाच्या या वैशिष्ट्याची दखल आजवर अनेकांनी घेतली असून मंडळाला जितकी वर्षं पूर्ण झाली आहेत, तितकेच मानसन्मान या मंडळाने पटकावले आहेत.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात वसलेल्या या गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९४९ मध्ये झाली. दहिसरची ओळख असलेल्या पुरातन विठ्ठल मंदिरात सुरुवातीला गणेशोत्सव साजरा केला जात होता. हळूहळू सदस्यांची संख्या वाढायला लागल्यानंतर १९८७पासून विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात गणेशमूर्तीची स्थापना व्हायला लागली. छोटी मूर्ती, मूर्तीच्या शेजारी अतिशय उद्बोधक आणि विचारशील असे देखावे, अनेक नवनवीन संकल्पनांना डोळ्यासमोर ठेवत समाजप्रबोधन करणारी चलचित्रे यांमुळे हे मंडळ वेगळं ठरू लागलं. गेली ६८ वर्षं ही परंपरा कायम राखत आता मंडळाची वाटचाल अमृत महोत्सवाच्या दिशेने सुरू आहे.

फक्त गणेशोत्सव साजरा करून हे मंडळ थांबत नाही. वर्षभर अनेक उपक्रम राबवणं, ते यशस्वी करून दाखवणं हेही विठ्ठल मंदिर सार्वजनिक गणेशोत्सवाचं खास वैशिष्ट्य. या मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र म्हात्रे(उपविभाग प्रमुख, मा. नगरसेवक, शिवसेना) यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ दीडशेहून अधिक कार्यकर्ते वर्षभर निरनिराळे उपक्रम राबवतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला, शिवजयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा विविध सण-उत्सवांना साजरं करण्याची परंपरा या मंडळाने अविरत सुरू ठेवली आहे. आश्रमशाळा तसेच अनाथाश्रमातल्या मुलांना मोफत वह्या, क्रीडासाहित्य यांचे वाटप करणे, गरजू विद्यार्थ्यांना कमी दरात वह्या-पुस्तके उपलब्ध करून देणे, विविध शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे असे अनेक उपक्रम मंडळ राबवतं. याखेरीज विविध प्रकारची मोफत वैद्यकीय शिबिरं, रांगोळी प्रदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार अशा चौरस कामगिरी केल्यामुळे मंडळ दहिसरवासीयांमध्ये लोकप्रिय आहे.

यंदा आपलं ६९ वं वर्षं साजरं करणाऱ्या विठ्ठल मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तारांगण आपल्या द्वारी हे चलचित्र उभारलं आहे. सूर्यमाला आणि त्यात असलेल्या अनेक ग्रह-ताऱ्यांची वैशिष्ट्ये सांगणारं हे चलचित्र असून आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय होत आहे. गणेशोत्सवाचं मूळ रूप न हरवू देता समाजप्रबोधन करणारं हे मंडळ पश्चिम उपनगरातलं एक आदर्श गणेशोत्सव मंडळ आहे.