विठ्ठल विठ्ठल


आसावरी जोशी,[email protected]

विठ्ठल.. विठोबा… राजस, देखणा पण अगदी सामान्यात सामान्य होऊन राहणारा… तुमच्या-आमच्यासारखाच… तो देत असलेलं जगण्याचं सारही त्याच्यासारखंच सुलभ… हवंहवंसं… या विठुरायाला तुमच्या-आमच्यात शोधण्याचा केलेला प्रयत्न…

अगदी काळाशार… गेली युगानुयुगे तो ध्यानस्थ उभा आहे… मिटल्या डोळ्यांनी, मिश्किल हसू ओठाआड मुडपून… योगेश्वराचे हे सगुण, सुंदर रूप म्हणजे आपल्या लाल-काळ्या मातीचे परब्रह्म… आपल्या महाराष्ट्राचा हा कानडा राजा…

या मातीवर, या रांगडय़ा भूमीवर… इथल्या साध्या-भोळ्या प्रजेवर निरतिशय माया करणारा… आषाढ आणि कार्तिकातील एकादशींना आपल्या भक्तांची आसुसून वाट पाहणारा हा सावळा विठ्ठल. त्याचे खरे नाव विठ्ठल सोडून त्याला त्याच्या भक्तमंडळींकडून अक्षरशः असंख्य नावं… लोभाची… प्रेमाची… मायेची… भक्तीची… अगदी रागाचीसुद्धा… सावळा, विठूराया… विठोबा… सात्त्विक संतापाचा कडेलोट झाला की त्याचे लाडके भक्त त्याला अगदी ‘काळ्या’ अशीही हाक मारतात… आणि ही हाक त्याच्याही अगदी हृदयाला भिडते व त्याच्या प्रिय भक्तांसाठी तो त्वरित उभा ठाकतो… कंबर कसून…

कर्नाटकातून आलेले हे सावळे परब्रह्म महाराष्ट्राच्या मातीशी… सह्याद्रीशी इतके एकरूप झाले की या विठोबाचे प्रतिबिंब संपूर्ण महाराष्ट्रातच दिसते. महाराष्ट्राचं ओबडधोबड… रांगडं… तरीही नितांत राजस रूपडं त्याच्या रूपात अगदी मिसळून गेलं आहे. म्हणूनच इथल्या काळ्या मातीतील शेता-शिवारातून तो प्रसन्न हसत प्रगटतो… काळाशार सह्याद्री होऊन भरभरून पाऊसधन घेऊन बरसतो. सामान्य माणसाच्या भजन-अभंगावर तल्लीन होऊन डोलू लागतो… सामान्यांच्या घरची भाजीभाकरी तर त्याच्या भलतीच आवडीची… त्याच्या दृष्टीने या रुचकर नैवेद्याचा आनंद काही निराळाच. पंचपक्वान्नांकडे मग तो वळतही नाही.

सामान्यांमध्ये रमलेला..

आपल्या प्रत्येक सुखदुःखाशी तो समरसलेला… सामान्यांच्या सगळ्या गोष्टीत त्यात प्रचंड रस… तो त्यात कायमच गुंतलेला… अडकलेला… येथे हा राजस योगी त्याचे माऊलीपण वारंवार सिद्ध करत राहातो. हे त्याचे आईपण तुकोबा रायांच्या… नामदेवांच्या अभंगांतून… जनाई-मुक्ताईच्या ओव्यांमधून, ज्ञानराजाच्या ज्ञानेश्वरीतून… विराण्यांतून सगुण साकार होते आणि अगदी आजच्या हायटेक युगातही तुमच्या- माझ्यासारख्यांचे मनोबल वाढवते… जगण्याला दिशा देते… चिवट जिद्दीला वाढवते… जोपासते… आई याहून वेगळी काय असते…?

विठ्ठलनामाचे विज्ञान

कित्येक दिवस अनवट वाट तुडवत लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. या संपूर्ण वाटेवर अभंग, ओव्यांतून विठूनामाचा गजर केला जातो. हा गजरच त्यांना वारीत चालण्याची प्रेरणा देतो हे संशोधनातून समोर आले आहे. एशियन जर्नल ऑफ कॉम्प्लिमेंटरी ऍण्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन यांच्या अहवालानुसार ‘विठ्ठल’ नावाचा जप केल्यास हृदयाचे कार्य सुधारते. तसेच हृदय चक्रालाही चालना मिळते. विठ्ठल या तीन अक्षराभोवती विज्ञानासहीत मानवी भावभावना गुंफल्या गेल्या आहेत.

स्वर आणि व्यंजनांनी मिळून देवनागरी लिपी बनते. स्वर हे स्वावलंबी तर व्यंजनं स्वरांवर अवलंबून असतात. व्यंजनांनी अल्पप्राण व महाप्राण अशी विभागणी होते. यानुसार विठ्ठल या तीन अक्षरांत या दोन्हींचा समावेश आहे.

आपले शरीर हे सात चक्रांनी बनलेले असते. त्यापैकी हृदयाजवळ असलेले चक्र म्हणजे अनाहत चक्र. शरीरातील प्रत्येक चक्राचे बीजाक्षर असते. त्यानुसार अनाहत चक्राचे बीजाक्षर ‘ठ’ आहे. हे अक्षर अन्य कोणत्याही चक्रावर अवलंबून नसून थेट हृदयचक्राशी निगडित आहे.

आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात वाताचे नियंत्रण प्राण घटकावर अवलंबून असते. त्याचे स्थान हृदयाजवळ असते. ‘ठ’ हा महाप्राण शब्द असून त्याचा ‘विठ्ठल’ या शब्दात दोनदा समावेश होत असल्याने त्याचा जप केल्यास हृदयावर चांगला प्रभाव पडतो. हा प्रयोग ३० जणांवर करण्यात आला. त्यानुसार ९ मिनिटे ‘विठ्ठल’ नावाचा जप त्या लोकांचे नाडीचे ठोके, हृदयाचे ठोके व रक्तदाब  ५ टक्क्यांनी सुधारला. तसेच त्यांचा शारीरिक उत्साह आणि ऊर्जाही वाढली. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघंही विठ्ठलात सामावले असल्याने विठोबाची मूर्ती ही योगमूर्ती समजली जाते. वारकरी वारीदरम्यान चालत, विठ्ठलाचा जयघोष करत पंढरपुरात येतात. चालण्यामुळे आपसूकच व्यायाम होऊन हृदयाचे चलनवलन सुधारते.

वारी म्हणजे व्यायाम

मला वाटते, अशा पद्धतीने व्यायामाला प्रोत्साहन देणारा, चालना देणारा मारूतीरायानंतर विठूरायाच असावा. चालण्याबरोबर विविध खेळ, फुगडी, हमामा म्हणजे वारीचा आणि वारकऱयांचा आत्मा. त्याशिवाय ही वारी पूर्णच होऊ शकत नाही. मूळचेच शरीराने काटक वारकरी या खेळांनी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मैलोनमैल चालण्याने अजूनच निरोगी आणि सुदृढ होतात… आणि या सगळ्या भक्तिमय व्यायामाच्या जोडीने भाजी-भाकरीसारखा संतुलीत, सात्त्विक आहार. वारकऱयांच्या उत्तम तब्येतीचे गमक हे येथेच असले पाहिजे.

विठुरायाची दिनचर्या

स्वतः विठूरायाही आपल्या दिनचर्येविषयी अत्यंत जागरूक आणि सतर्क असतो. पहाटे चार वाजता विठोबाचा दिवस सुरू होतो. पंतांना उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते. सवाचार वाजता काकडय़ाला सुरुवात होते. आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा होते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखविला जातो. दुपारी ४ वाजता देवाचा चेहरा पुसून नवीन पोशाख आणि अलंकार घातले जातात. येथे विठूरायाची जगण्यातली रसिकता दिसून येते. झळाळत्या रंगांचे, रेशमी, सुती परिधान त्याला फार प्रिय आहेत. पिवळ्या, केशरी, लाल रंगाचे पितांबर… ऋतुमानानुसार कधी सुती तर कधी रेशमी, भरजरी अंगरखा… डोईवर कधी मुकूट तर कधी फेटा, पागोटे, रोजच्या दिवशी मोजके अलंकार… आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिरव्याकंच तुळशीच्या सान्निध्याशिवाय त्याचा साजशृंगार पूर्ण होऊ शकत नाही.

थंडीच्या दिवसात ऊबदार लोकरीची शाल, उन्हाळ्यात चंदनाचा शीतल लेप तर पावसाळ्यात केशरी काढा असे सगळे स्वतःचे लाडकोड विठोबा भक्तांकडून पुरवून घेत असतो… आणि आपण भक्तगणदेखील या सावळ्या रूपाचे कोडकौतुक पुरवत असतात.

समस्त महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरीदास त्याच्याकडे सारख्याच भक्तिभावाने येतात. तुकोबारायांना विठोबाचे हे रूप सुंदर भासले. कारण हे ध्यान स्थिर आहे. शांत आहे. भक्तांची वाट पाहून किंवा त्यांच्या गजरकल्लोळाने दमत नाही… विचलित होत नाही. मनाच्या स्थिरतेचे हे प्रतीक आहे.

त्याचे आपल्यासारखे सामान्यपण म्हणजे तो द्विभुजच आहे. अतार्किक देवत्व त्याच्यात नाही. त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. फक्त ज्ञानाचे प्रतीक असलेला शंख आहे, तर उजव्या हातात कमळ आहे. त्याच्यात आणि रखुमाईत सर्वसाधारण पतीपत्नींप्रमाणेच रागरुसवे आहेत. म्हणून तर रखुमाई दूर उभी राहिली आहे. तिथूनच ती त्याचे आणि भक्तांचे कोड कौतुकाने पाहाते आहे.

गोपाळकाला

सामान्यांबरोबर सामान्य होणं हे तर पंतांचे वैशिष्टय़. म्हणूनच ते विठोबा. या पंढरीच्या वारीची सांगता गोपाळकाल्यानेच होते. गोपाळकाला हे वारकऱयांचे वैशिष्टय़ आहे. पौर्णिमेच्या दिवशी सर्व वारकरी आपापल्या दिंडय़ा घेऊन भजन करीत गोपाळपूर येथे गोपाळकृष्ण मंदिरात गोपाळकाल्याच्या सोहळ्याने वारीची सांगता करतात. हा काला दही, ज्वारीच्या लाह्या, मीठ, मिरचीपासून केलेला असतो. ‘तुम्ही आम्ही खेळीमेळी आनंदे।’ असा गोपाळकाल्याचा सोहळा असतो. एकमेकांच्या मुखात काला प्रसादभावाने भरवितात. येथे परस्परांतील भेद मिटतो. समतेचा संदेश जातो. ज्याची आज आपल्याला खरोखरच गरज आहे.

विनाकारण भूतकाळातील भुते उकरून काढून जातीपातीचे राजकारण करणाऱयांसाठी हा गोपाळकाला खरेच धडा देणारा ठरावा. ज्या मुलीने प्रतिकूलतेवर मात करत धावण्याच्या स्पर्धेत आपल्या देशाला सर्वोच्च स्थानावर नेऊन बसविले तिची जात समाजमाध्यमांच्या आधुनिकतेतून शोधली जाते. या मानसिकतेसाठी असा गोपाळकाला होणे खूप गरजेचे आहे.

विलक्षण गोड सात्त्विकतेने… राजसपणे हे सावळे सुंदर भिवरेच्या तीरावर संपूर्ण जगण्याचे सार शिकवीत निश्चल उभे आहे. त्याच्याच काही लेकरांची खल प्रवृत्ती नष्ट होण्याची वाट पाहात… कारण ते खलत्व गेले की राहिलेला माणूस हे त्याचेच लेकरू… फक्त तो युगानुयुगे देत असलेले निर्मळ, सुंदर जगणे अमलात आणणे आपल्याच हाती आहे. ते एकदा समाजाच्या अंगोपांग झिरपले की समाधानाचा हुंकार तो घट्ट मिटल्या ओठांनी हसत हसत देईल… आणि मिटल्या डोळ्यांनी त्याच्या लाडक्या भक्तांचे कौतुक पाहात राहील.