ठसा – शंकर ढमाले

>> विठ्ठल देवकाते

कबड्डी या मराठमोळय़ा खेळाच्या विकासासाठी एक विशिष्ट उद्दिष्ट डोळय़ापुढे ठेवून निःस्वार्थ वृत्तीने अहोरात्र कार्यरत असलेले पुण्यातील शंकर ढमाले यांचे नुकतेच निधन झाले. आजन्म अविवाहित राहिलेल्या शंकर ढमाले यांनी कबड्डी या खेळाशीच लग्न लावलं होतं असं गमतीनं म्हटलं जायचं. 23 मार्च 1947 रोजी जन्मलेल्या शंकर ढमाले हे मुळशीतील बेलावडे गावचे असले तरी नंतर ते पुण्यात स्थायिक झाले.

शर्ट आणि पॅण्ट असा त्यांचा साधा पेहराव असायचा. काही कार्यक्रम असल्यास ते ब्लेझर घालायचे. रोज सकाळी आणि सायंकाळी ते पुणे ऍमॅच्युअर्स संघाच्या मैदानावर खेळाडूंच्या सरावासाठी हसतमुख चेहऱयाने हजर असायचे. मैदानावरील त्यांची देहबोली खेळाडूंसाठी प्रेरणादायी अशीच होती. पीळदार शरीरयष्टी, चालण्याची ऐट, बोलण्याचा थाट हा कबड्डीपटूंच्या बोलण्यातील नेहमीचा विषय असायचा. पुणे जिह्यातील कबड्डीचा विकास करताना ज्येष्ठ नेते शरद पवार, नाना शितोळे, सुरेश कलमाडी, माजी क्रीडामंत्री श्यामराव अष्टेकर यांच्यासह पुणे जिह्यातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींच्या खांद्याला खांदा लावून ढमाले यांनी काम केलेले आहे. जिह्यातील कबड्डी वाढवण्यात ढमालेंचा मोठा वाटा होता. कबड्डीतील हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. पुणे जिल्हा संघटनेत विविध पदांवर त्यांनी काम केले. पुण्यातील कबड्डीत लौकिक असणाऱया पुना ऍमॅच्युअर्स संघाच्या स्थापनेपासून ते अखेरपर्यंत संघाशी जोडले गेले होते. ढमाले यांचे व्यक्तिमत्त्व कमालीचे करारी होते. कबड्डी परिवारात त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदरयुक्त दरारा होता.

महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत संघटक शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना गौरवले होते. विदेशी खेळांमुळे स्वदेशी खेळांचा नायनाट होता कामा नये. आपले देशी खेळ लोकप्रिय का होत नाहीत, अशी खंत शंकर ढमाले नेहमीच व्यक्त करायचे. ज्या पुणे ऍमॅच्युअर्स कबड्डी संघात त्यांची कारकीर्द घडली, त्या संघात ते अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. खेळाडूनंतर संघटनेतील विविध पदे भूषवत त्यांनी कबड्डी या खेळाची इमाने इतबारे सेवा केली. त्यांनी अनेक उत्तम कबड्डीपटू घडविले. पुणे ऍमॅच्युअर्सचा तगडा महिला कबड्डी संघ बनविण्यातही शंकर ढमाले यांचा सिंहाचा वाटा होता. नोव्हेंबर 2010मध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून शंकर ढमाले यांना 1,11,101 रुपये देऊन गौरविण्यात आले होते. त्यांनी हा गौरवनिधी कबड्डी खेळाडू कल्याण निधी म्हणून व्यासपीठावरच देऊन टाकला होतो. कबड्डी या खेळाला शिस्तीच्या चौकटीत बसवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहिला. पुणे जिल्हा संघटनेला एका वेगळय़ा उंचीवर नेण्यात शंकर ढमाले यांचा मोठा वाटा होता. कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या कडक शिस्तीत तयार झालेले शेवटचे कबड्डी प्रशासक असलेले शंकर ढमाले यांची 24 जुलै रोजी वयाच्या 76 व्या वर्षी इहलोकीची यात्रा संपली.