वोडाफोनची आयडिया

अमित घोडेकर,[email protected]

आता वोडाफोन आणि आयडिया ही एकच कंपनी असणार आहे. दोन्ही कंपन्या आता एकत्र झाल्या आहेत. याचा फायदा सामान्यांना काय होणार ते पहायचं?

गेल्या 2 वर्षांतील अख्ख्या हिंदुस्थानात चर्चेचा विषय म्हणजे 4जी हाच आहे… आणि 4जी म्हटले की, सगळ्यात पहिलं नाव येतं ते रिलायन्स जिओचं. जिओने सुरुवातीला वर्षभर 4जी इंटरनेट फुकट वापरायला दिले, पण इंग्रजीत एक म्हण आहे ती म्हणजे ‘नो फ्री लंच’ म्हणजे कोणतेही दिलेले जेवण फुकट नसते. रिलायन्स जिओचं पण अगदी तसंच होतं. सुरुवातीला फुकट म्हणून घेण्यासाठी लोकांनी जिओच्या दुकानाबाहेर रांगा लावल्या. रिलायन्स जिओचे तंत्रज्ञान हे 4जीवर आधारित होते. त्यामुळे इंटरनेटचा वेग अतिशय भन्नाट आहे. त्यामुळेच तासाभरात होणाऱया गोष्टी मिनिटात आणि मिनिटात होणाऱया गोष्टी सेकंदात होऊ लागल्या. लोक जिओच्या या वेगाच्या प्रेमात पडले. त्यामुळेच मग एक वर्ष फुकटात इंटरनेट वापरल्यावरही जवळपास सगळेच जिओचे ग्राहक आता पैसे देऊन जिओ वापरत आहेत आणि जिओचे सध्या 20 कोटीहून अधिक ग्राहक झाले आहेत.

रिलायन्स जिओमुळे टेलिकॉम क्षेत्रात जरी एक प्रकारची क्रांती झाली तरी गेल्या दोन दशकापासून टेलिकॉम क्षेत्रात असणाऱया इतर कंपन्यांचे धाबे दणाणून सोडले आहे. एकतर सुरुवातीला रिलायन्स जिओचे फुकटचे आव्हान सगळ्यांना थोडय़ा दिवसांचे मनोरंजन असेच वाटले, पण जसजसा ग्राहकांचा आकडा वाढू लागला तसतसा हा त्यांना चिंतेचा विषय होऊ लागला. आता तर टेलिकॉम सेवा देणाऱया बहुतेक कंपन्या आपले ग्राहक रिलायन्सकडे जात आहेत हे उघडय़ा डोळ्यांनी बघत आहेत. बऱयाच कंपन्या चक्क तोटय़ात गेल्या आहेत. काही तर बंददेखील झाल्या आहेत. रिलायन्सचे हे जिओ प्रकरण सगळ्यांना अशा प्रकारे खूप महागात पडले आहे.

या सगळ्यात काही अंशी एअरटेल या टेलिकॉम कंपनीने आपले ग्राहक बऱयापैकी सांभाळून ठेवले आहेत, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एअरटेलनेही रिलायन्सनंतर लगेच बऱयाच ठिकाणी 4जी सेवा सुरू केली होती आणि त्यांनीदेखील जिओच्या फुकट इंटरनेटला स्वस्त इंटरनेटचा पर्याय दिला होता. याच नीतीचा अवलंब करून हिंदुस्थानातील जवळपास सगळीकडे असलेल्या आयडिया या टेलिकॉम कंपनीनेही बऱयाच ठिकाणी 4जी सेवा सुरू केली आणि 1 + 1 + 2 च्या ऐवजी 1 + 1 ङ 11 या चाणक्य नीतीचा वापर करून जगातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोनसोबत करार केला.

आता या कराराप्रमाणे वोडाफोन आणि आयडिया ही एकच कंपनी असणार आहे. गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या कायदेशीर बाबी आता पूर्ण करण्यात आल्या आहेत आणि दोन्ही कंपन्या आता एकत्र झाल्या आहेत. या कंपनीचे मुख्य म्हणून आयडियाचे प्रमुख कुमारमंगलम बिर्ला हेच राहणार आहेत. या एकत्रीकरणाचा परिणाम म्हणजे या नवीन कंपनीची ग्राहक संख्या 40 कोटीहून अधिक होईल. त्याचबरोबर या दोन्ही कंपन्यांना एकमेकांचे नेटवर्क वापरता येणार आहे. वोडाफोन ही टेलिकॉम क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी असल्यामुळे आयडियाला त्यांचे अद्ययावत तंत्रज्ञानदेखील वापरता येईल. काही वर्षांपूर्वी वोडाफोन आपल्या जाहिरातीमध्ये एक छोटा कुत्रा कसा सगळ्यांचा सदासर्वकाळ पाठलाग करतो हे दाखवले जायचे आणि शेवटी वोडाफोनवाले म्हणायचे की जिकडे तुम्ही, तिकडे आमचे नेटवर्क. वोडाफोनच्या नवीन आयडियाने कदाचित आता हे शक्य होईल. आता हेच बघायचे की, वोडाफोनची ही नवीन आयडिया रिलायन्स जिओला कशी टक्कर देते!