शेतकर्‍यांन हक्काचे पाणी मिळण्यासाठी सुजयला मत द्या, राधाकृष्ण विखेंचे आवाहन


सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा

कुकडी आणि घोड धारणासह भीमानदीला पाण्यासाठी पुणेकरांशी नेहमी संघर्ष करून पाण्याची भीक मागावी लागते. धरणे जरी पुणे जिल्ह्यातील असतील तरी त्यातील पाणी शेतीसाठी देणे क्रमप्राप्त आहे. शेतीला पाणी न दिल्यास शेतकऱ्याच्या मुलांनी शेती पडीक पडल्यास काय करायचे? पुणेकरांशी घोड, कुकडी आणि भीमानदी पाण्यासाठी संघर्ष करणारा कुठलीही व कसलीही तडजोड न करता दोन हात करून लढा देऊ. तसेच या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी डॉ सुजय विखे पाटील योग्य उमेदवार असून त्यांना लोकसभेत पाठवा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

 सोमवारी काष्टी व आढळगाव जिल्हा परिषद गटातील आर्वी, अजनुज, कौठा,गार,पेडगाव,आनंदवाडी,लिंपनगाव सह परिसरातील वाड्या वस्त्यांवर भाजप शिवसेना युतीचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचार दौरा केला. या निमित्त आनंद वाडी  येथे जिल्हा परिषद सदस्य पंचशीला गिरमकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत  ते बोलत होते.

विखे म्हणाले की घोड कुकडीचे धरणे पुणे जिल्ह्यातील असले तरी पाण्याचे पहिले प्राधान्य पिण्यासाठी व नंतर शेतीसाठी आणि शिल्लक राहिले तर औद्योगिक व्यवसायासाठी असे वाटप  असून जायकवाडीच्या व लवादाच्या नियमानुसार सर्वांना समान हक्काने पाणी देण्याचे गरजेचे आहे. असे असताना नेहमीच  पुणेकर पाण्याच्या बाबतीत अन्याय करतात. त्यांचे जो ऐकेल त्यांच्याशी तडजोड करेल अशाच उमेदवारांना ते उमेदवारी देतात असा आरोप करत स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी देखील पाण्याबाबत पुणेकरांशी संघर्ष केला होता याची आठवण करून दिली.

उद्या डॉ सुजय विखे देखील पुणेकरांशी कुठलीही तडजोड न करता पाण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दोन हात करेल अशा विश्वाक विखे यांनी व्यक्त केला. मी राज्याचा विरोधी पक्षनेता असूनही डॉ. सुजयला त्यांनी उमेदवारी नाकारली. आज घोड धरण कोरडे पडले आहे त्यातील पाणी कुठे गेले? असा प्रश्न त्यांनी विचारला.

डॉ सुजय  विखे पाटील यांच्या तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या व पुणेकरांशी लढण्याची व दोन हात करण्याची ताकद विखे घराण्यात आहे असे विखे म्हणाले.