राज्यात तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात मंगळवारी मतदान

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 14 मतदार संघामध्ये मतदान होणार असून 249 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

तिसऱ्या टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार असून बारामती मतदार संघात सर्वाधिक चार महिला उमेदवार आहेत. तर पुणे व माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी 31 उमेदवार असून सर्वात कमी  09 उमेदवार हे सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत. याशिवाय जळगाव (14), रावेर (12), जालना (20), औरंगाबाद (23),रायगड (16), बारामती (18), अहमदनगर (19), सांगली (12), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (12), कोल्हापूर (15) व हातकणंगले (17) उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.