हिमाचल प्रदेशमध्ये ९ नोव्हेंबरला मतदान, गुजरात वेटिंग लिस्टमध्ये

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ९ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आणि १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदानाची पावती मिळणार असून मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र गुजरातमध्ये १८ डिसेंबरच्या आधी विधानसभा निवडणुका होतील, असे सांगण्यात आले.

मुख्य निवडणूक आयुक्त अचलकुमार ज्योती यांनी पत्रकार परिषदेत हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचा विस्तृत कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक व्यवस्थित पार पडावी म्हणून खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रायल (VVPAT) यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केल्यानंतर मतदाराला पावती मिळेल आणि आपण ज्याला मत दिले त्यालाच मत नोंदवले गेल्याची खातरजमा करता येईल.

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६८ जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी होणार मतदान

१८ डिसेंबर रोजी मतमोजणी

मतदानासाठी ७५२१ मतदान केंद्रांची व्यवस्था

उमेदवारांना खर्च मर्यादा २८ लाख रुपयांपर्यंत

१६ ते २३ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

२४ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार

२६ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेता येणार