मतदान यंत्रे अन्न महामंडळाच्या गोदामात स्ट्रॉंग रूममध्ये: कडक सुरक्षा व्यवस्था

2

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काल झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी आज दुपारी जाहिर करण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ६१.६९ टक्के मतदान झाले. १४ लाख ५४ हजार ५२४ मतदारांपैकी ८ लाख ७९ हजार २४६ मतदारांनी हक्क बजावला. त्यामध्ये ४ लाख ४७ हजार ६३३ पुरुष आणि ४ लाख ४९ हजार ६१३ महिला मतदारांनी हक्क बजावला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान यंत्रे एमआयडीसी येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली असून दिनांक २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघात ५६.५७ टक्के मतदान झाले. १ लाख ५२ हजार ८९२ मतदारांनी हक्क बजावला. त्यामध्ये ७५ हजार ००१ पुरुष आणि ७७ हजार ७९३ महिला आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ६२.९६ टक्के मतदान झाले. १ लाख ७६ हजार ८०४ मतदारांनी हक्क बजावला. त्यामध्ये ८६ हजार ८५५ पुरुष आणि ८९ हजार ९१२ महिला आहेत.  राजापूर विधानसभा मतदारसंघात ६२.९६ टक्के मतदान झाले.१ लाख ३८ हजार १६६ मतदारांनी हक्क बजावला. त्यामध्ये ६४ हजार ३३५ पुरुष आणि ७३ हजार ८३१ महिला, कणकवली विधानसभा मतदारसंघात ५८.०९ टक्के मतदान झाले. १ लाख ७६ हजार ८०४ मतदारांनी हक्क बजावला. त्यामध्ये ७३ हजार ३६९ पुरुष आणि ७२ हजार ५९२ महिला, कुडाळ विधानसभा मतदारसंघात ६७.१५ टक्के मतदान झाले. १ लाख ३१ हजार १२० मतदारांनी हक्क बजावला.त्यामध्ये ७१ हजार २८७ पुरुष आणि ६५ हजार ८३३ महिला,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ६७.९० टक्के मतदान झाले. १ लाख ४६ हजार ४०१ मतदारांनी हक्क बजावला. त्यामध्ये ७६ हजार ७४९ पुरुष आणि ६९ हजार ६५२ महिला मतदारांनी हक्क बजावला.

स्ट्रॉंग रुम भोवती कडक बंदोबस्त
सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे आज एमआयडीसी येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली आहेत. मतयंत्र ठेवण्यात आलेल्या इमारतीच्या आवारात केंद्रीय राखीव दल,राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इमारतीमध्ये सीसीटिव्ही लावण्यात आला असून अधिकृत व्यक्तीशिवाय कुणाला इमारतीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. २३ मे पर्यंत हा पोलीस बंदोबस्त रहाणार आहे.