व्यंकटेश बालाजी मंदिरात शुक्रवारी दीपोत्सव

सामना ऑनलाईन । नाशिक

गंगापूरच्या सोमेश्वर धबधब्याजवळील व्यंकटेश बालाजी मंदिरामधील १२वा दीपोत्सव यंदा त्रिपुरारी पौर्णिमेला शुक्रवारी, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे. बालाजी मंदिराच्या स्थापनेपासूनच अखंड समई तेवत आहे. दरवर्षी हजारो भावीक या दीपोत्सवात सहभागी होतात व लक्ष-लक्ष पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून जातो.

अतिशय शिस्तबद्ध व्यवस्थेत प्रत्येकाला बालाजीचे दर्शन होवून हा नयनरमणीय सोहळा अनुभवता यावा याकरीता शंकराचार्य न्यास दरवर्षी चोख व्यवस्था ठेवत असते. गंगापूर रस्त्याकडून मंदिर रस्त्याकडे वळल्यानंतर डाव्या बाजूच्या मैदानात कार पार्किंगची व्यवस्था असून, दुचाकीची मंदिर परिसरात व्यवस्था आहे. दुचाकींस्वारांनी परतताना परिचय उद्यान रस्त्याकडून गंगापूर गावातून मुख्य रस्त्याकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शुक्रवारी, ३ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता उद्योजिका लक्ष्मीदीदी गलाणी आणि इनोव्हा रबर्सचे हेमंत बक्षी यांच्या हस्ते प्रथम दीपप्रज्वलन होऊन दीपोत्सवास प्रारंभ होईल. नाशिककरांनी या सोहळ्यात उत्साह व शिस्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष डॉ. आशीष कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद भार्गवे, व्यवस्थापक राजेंद्र जोशी यांनी केले आहे.