पन्नास दिवस पूर्ण होण्याची वाट पाहतोय!

30


सामना ऑनलाईन। रत्नागिरी

आता मी ५० दिवस पूर्ण होण्याची वाट बघतोय. दहाच दिवस शिल्लक राहिले आहेत, मग बघूया काय आबादीआबाद होते ते, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नोटाबंदीवर सरकारला तडाखा लगावला.
पाली येथील कौशल्यविकास योजनेचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नोटाबंदीविरोधात नव्हे, तर त्याच्या अंमलबजावणीत जो गोंधळ उडाला आहे त्याविरोधात आम्ही सर्वप्रथम आवाज उठवला, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या शेतकर्‍यांना काळं आणि पांढरं माहिती नाही त्यांच्या बँक खात्यांवर, घरांवर लक्ष ठेवले जात आहे. आता त्यांनाही इन्कमटॅक्स लावणार का? आज जनता या सर्व प्रकारांनी त्रस्त झालेलीच आहे.
अनेक जिल्ह्यामध्ये निधी उपलब्ध होत नाही अशा तक्रारी आहेत. त्यासंदर्भात शिवसेनेचे आमदार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये दर तीन-चार महिन्यांनी आम्ही बैठका घेतो. ही जी काही समस्या आहे त्यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू असतो असे सांगताना शिवसेना-भाजपमध्ये दरी आहे असे काही नाही. मात्र आम्ही सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करतो. एखादा निर्णय चुकीचा असेल तर त्वरित आम्ही तो अयोग्य असल्याचे सांगतो. याचा अर्थ आम्ही लगेच विरोधकांच्या नाकावर जाऊन बसतो असे नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारच्या कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्रालय नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पाली येथे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षण केंद्र डी. जे. सामंत हायस्कूलच्या इमारतीत आजपासून सुरू झाले. शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नामुळे कौशल्यविकास प्रशिक्षण प्रकल्पाचे पहिले केंद्र आजपासून रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथे सुरू झाले. या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र वायकर, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक उन्मेष जोशी, समीर जोशी, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम, आमदार उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, आदी मान्यवर उपस्थित होते.
‘समृद्धी एक्स्प्रेस’बाबत शेतकर्‍यांना भेटणार
समृद्धी एक्स्प्रेसबाबत भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, समृद्धी एक्स्प्रेसला आमचा विरोध नाही, पण शेतकर्‍यांची बाजूही ऐकून घेतली पाहिजे. शेतकर्‍यांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या सुपीक जमिनी घेऊ नयेत. कालच मी शेतकर्‍यांशी फोनवरून बोललो. शनिवारी मी त्या शेतकर्‍यांना भेटायला जाणार आहे.
शिवस्मारक झालेच पाहिजे, कोळी बांधवांचा आवाजही ऐका
समुद्रामध्ये शिवस्मारक हे झालेच पाहिजे. मात्र त्याठिकाणी कोळी बांधवांचा जो आवाज आहे तोही ऐकायला हवा. शिवस्मारक बांधण्याचे आपण चांगलं काम करत आहोत, पण हे चांगलं काम करत असताना कोळी बांधवांनाही विश्‍वासात घ्यायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या