मातीतले खेळ

बाळ तोरसकर,[email protected]

चालण्याच्या स्पर्धेचा समावेश मैदानी खेळात होतो. यातील नियम पाळत चालल्यास कमीत कमी वेळात मोठे अंतरही न दमता कापता येऊ शकते. विशिष्ट पद्धतीने चालल्यास स्पर्धकाला चालताना चांगली गती मिळते.

काही वर्षांपूर्वी चालण्याची स्पर्धा म्हटल्यावर काही तरी वेगळेच वाटायचे. अशीही (चालण्याची) स्पर्धा असते का? काय ते फक्त चालायचे? अशा विचाराचेही काहीजण होते. पण यातही एकप्रकारचा वेगळाच आनंद आपल्या जीवनात आहे हे फारच थोडय़ा लोकांना उमगले आहे. सकाळी सकाळी जे चालायला जातात त्यांना जोरजोराने किंवा वेगाने चालणारी काही मंडळी नेहमीच भेटतात. ते जो सराव करतात त्याला चालण्याच्या स्पर्धेचा सराव म्हणतात. म्हणजे लांब लांब पावले टाकीत, न पळता, जलद चालण्याची स्पर्धा होय.

इंग्रजीत ‘हिल ऍण्ड टो’ (टाच व चवडा) या नावानेही ही स्पर्धा ओळखली जाते. कमीतकमी वेळेत विशिष्ट अंतर चालून जाणे हा या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम आहे. असे असले तरीही विशिष्ट कलावधीत सर्वाधिक अंतर चालणे अशाही स्पर्धा आयोजित केल्या जातात. जर जोरात चालणे हा नियम असला तर मात्र सगळ्यांनाच असे वाटेल की मुंबईचा माणूसच ही स्पर्धा जिंकू शकतो. कारण मुंबई ही 24 तास धावतच असते. मुंबईतील माणूस बस पकडायला धावतो, रेल्वे पकडायला धावतो, कार्यालयात वेळेवर पोहचायला नेहमीच पळापळ करत असतो. असे असले तरी या प्रकारच्या सरावावर तो चालण्याच्या स्पर्धेत जिंकू शकत नाही. त्यासाठी जे जलद व पद्धतशीर कसे चालावे याचे एक वेगळे शास्त्र आहे ते पाळावेच लागते.

चालण्याच्या स्पर्धेचा समावेश मैदानी खेळात होतो. यातील नियम पाळत चालल्यास कमीत कमी वेळात मोठे अंतरही न दमता कापता येऊ शकते. विशिष्ट पद्धतीने चालल्यास स्पर्धकाला चालताना चांगली गती मिळते. ज्यावेळी स्पर्धक वेगाने चालतो त्यावेळी त्याच्या पावलाचा कोणता तरी भाग जमिनीच्या संपर्कात असणे फारच महत्त्वाचे असते. मागचे पाऊल उचलण्यापूर्वी पुढच्या पायाची टाच जमिनीवर टेकलेली असावी. या पद्धतीत टाच जमिनीवर टेकल्यामुळे चालणाऱयाला स्वतःला पुढे झोकण्यास व स्वतःचे वजन चवडय़ावर सावरण्यास स्पर्धकाला मदतच होते. ज्यावेळी आपण वेगाने चालतो त्यावेळी पायाचा पुढचा पंजा पाय लांब टाकताना एकप्रकारचे आधार व ताण देण्याचे काम करेल. जर एखादा कुशल धावपटू एक मैल धावताना जो वेळ घेईल तितकेच अंतर वेगाने चालणाऱया स्पर्धकाला जवळजवळ अडीच मिनिटे जास्त लागतात. चालण्याच्या स्पर्धा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पाश्चात्य देशांत लोकप्रिय होऊ लागला होता.

walking

सकृत्दर्शनी चालण्याची स्पर्धा इतर स्पर्धांपेक्षा साधी, सोपी व कमी त्रासाची वाटत असेल तरी प्रत्यक्षात मात्र ती तशी सोपी नाही. झपझप चालत न पळता दूरवर चालत जाणे वाटते तितके सोपे नाही. या खेळात पायांचा दणकटपणा, हालचालींमध्ये लागणारे चापल्य, सहनशक्ती, चिकाटी, जागरूकता व हरहुन्नरीपणा या गुणांची कसोटी लागते. इंग्लंड, नेदरलँड, स्वीडन या देशांमध्ये शारीरिक क्षमता ठरविण्याच्या कामी चालण्याची कसोटी प्रमाण मानत असत. स्वीडन, रशिया, ऑस्ट्रेलिया, चेकोस्लोव्हाकिया इ. देश या खेळात आघाडीवर असून हिंदुस्थानात मात्र अलीकडच्या काळात आवड निर्माण होऊ लागली आहे. इंग्लंड येथे 1866 साली ऍमेच्युअर ऍथलेटिक क्लबतर्फे आयोजित केलेल्या चालण्याच्या स्पर्धेत जे. पी. चेंबर्झ याने सात (11.26 किलोमीटर) मैलांचे अंतर 59 मिनिटे व 32 सेकंदांत कापून विजय संपादन केला होता. त्याच्या सन्मानार्थ आजही त्याच्या नावाचे पुष्पपात्र विजयी स्पर्धकाला देण्यात येते व हा त्या स्पर्धेतला मोठा सन्मान समजला जातो.

चालण्याच्या स्पर्धेचा आता एवढा प्रसार झाला आहे की याचे सामने जगभर, वेगवेगळ्या देशात, राज्यात, जिल्हय़ात व गावागावात होऊ लागले आहेत. आजकाल चालणे कमी झाले आहे. तरुणांमध्ये चालण्याबरोबरच धावणे, पायऱया चढणे, सायकलिंग अशा व्यायाम प्रकारांचा पर्याय उपलब्ध आहे. ज्येष्ठ नागरिकांना मात्र हाडे सांध्यांच्या दुखण्यामुळे हे व्यायाम शक्य होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी चालण्याचा व्यायाम हा उत्तम व सुरक्षित तर आहेच व त्याचबरोबर चालताना हाडांचा एकमेकांवर दाब पडून त्या हाडांमध्ये कॅल्शियम साठा वाढवायला मदतच होते. हाडे मजबूत झाल्याने माणसामधील क्षमता वाढते व तो नेहमीच तंदुरुस्त राहतो. त्यामुळेच शक्य झाल्यास चालण्याच्या विविध स्पर्धांत भाग घेऊन निरोगी व तंदुरुस्त हिंदुस्थान घडवूया. त्यामुळे चला व निरोगी रहा.