मराठी पुस्तकवाले फ्लिपकार्ट

31

अमित घोडेकर

फ्लिपकार्ट ही ऑनलाइन सेवा मराठी पुस्तकांमुळे मराठी ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली… आता ते वॉलमार्टने विकत घेतले आहे…

गेल्या वर्षी दिवाळीमध्ये पहिल्यांदा ऑनलाइन सेल लागला होता. आपल्याकडील दुकानात किंवा एखाद्या मॉलमध्ये लागतो अगदी तसाच सेल इंटरनेटवर ऑनलाईन सुरु झाला. जशी दुकानाची आणि वस्तूंची जाहिरात केली जाते अगदी तशीच जाहिरात या ऑनलाइन सेलची केली गेली. या सेलमध्ये सेफ्टी पिनपासून ते कार आणि पेनपासून कोल्हापुरी चपलांपर्यंत हव्या त्या गोष्टी विकायला ठेवल्या गेल्या होत्या. या सर्व वस्तू बाजारभावापेक्षा स्वस्त आणि उत्तम गुणवत्ता असणाऱया होत्या हे तर सांगायला नकोच. जर तुम्हाला एखादी वस्तू आवडली नाही तर तुमच्या घरून ती वस्तू परत घेतली जाणार आणि तुम्हाला तुमचे पैसे परत…

जसा सेल लागल्यावर दुकानाबाहेर गर्दी होते तसीच मग इंटरनेटच्या दुनियेत प्रचंड गर्दी झाली आणि दोन दिवसात लाखो लोकांनी या सेलमधून अनेक वस्तू खरेदी केल्या. दुकानात गर्दीच्या सिझनमध्ये जशी चेंगराचेंगरी होते, तशीच चेंगराचेंगरी या ऑनलाइन सेलमध्येदेखील झाली. फक्त इथे कोणाला इजा मात्र झाली नाही, अनेकवेळा सर्व्हर बंद पडले. अनेकांना त्यामुळे ऑर्डर देताच आल्या नाहीत.. असे अनेक अपघातदेखील झाले. या फक्त दोनच दिवसात शेकडो कोटी रुपयांची उलाढाल झाली आणि एका कंपनीच नाव अगदी बच्चों बच्चों की जुबान पर आलं ते म्हणजे ‘फ्लिपकार्ट’.

बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल हे दोघे भाऊ नाहीत बरं का.. २००७ मध्ये आयआयटीमधून शिकल्यावर काही दिवस ऍमेझोन या जगातल्या सगळ्यात मोठय़ा इ-कॉमर्स कंपनीमध्ये काम केल्यावर स्वतःचा इ-कॉमर्स व्यवसाय सुरु करायचा असे बिन्नी व सचिनने ठरवले आणि सुरुवात झाली फ्लिपकार्टची…

अगदी मायक्रोसॉफ्ट किंवा ऍपलप्रमाणेच एका छोटय़ा घरातून फ्लिपकार्टची सुरुवात झाली. सुरूवातीचं भांडवल होतं अवघं ४ लाख रुपये. ही गोष्ट आहे २००७ मधली. सुरुवातीला फ्लिपकार्ट त्यांच्या संकेतस्थळावर फक्त पुस्तक विकत असे आयआयटीयन असलेले बंसल्स त्याकाळी चक्क सर्व काम करत असत. म्हणजेच एखाद्या ग्राहकाची ऑर्डर आली की पुस्तक दुकानातून विकत आणायचे ते पुस्तक घेवून ग्राहकाच्या घरी जायचे त्याची डिलिव्हरी द्यायची पैसे घायचे असा सर्व हमालीचा धंदा हे दोघे करत असत. खरे तर एक प्रकारची ऑनलाइन हमालीच म्हणा ना… त्यात फ्लिपकार्ट चालवायची म्हणजे पैसे वाचवणे आलेच मग कधी बसने प्रवास तर कधी चालत असे सुरुवातीच्या काही वर्षात भयंकर कष्टप्रद प्रवास फ्लिपकार्टने बघितला.

अगदी २ वर्षातच फ्लिपकार्टची ओळख ऑनलाइन पुस्तके विकणारे चांगले संकेतस्थळ अशी झाली आणि सुरु झाला हिंदुस्तानच्या पहिल्या इ-कॉमर्सचा दमदार प्रवास.. पण कोणतीही इ-कॉमर्स कंपनी चालवणे म्हणजे काही खायचं काम नसते.. वस्तू मागवण्यापासून ते पुरवण्यापर्यंत आणि पैसे वसुलीपासून ते अगदी चांगला माल पुरवण्यापर्यंत अनेक गोष्टी कराव्या लागतात. फ्लिपकार्टची खासियत म्हणजे त्यांनी बऱयाच गोष्टी स्वतःसाठी सुरु केल्या, म्हणजे ग्राहकाला माल पोचवण्यासाठी कुरियर सेवा घ्यावी लागते. फ्लिपकार्टने स्वतःची कुरियर सेवा सुरु केली, आजकाल सगळ्यात जास्त खप इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा होता फ्लिपकार्टने स्वतःची इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी कंपनी सुरु केली. आज फ्लिपकार्टमध्ये हजारो लोक काम करतात आणि हिंदुस्तानमधील १ अब्जापेक्षा जास्त धंदा करणाऱया कंपन्यामध्ये फ्लिपकार्टची गणना होते.

कधीकाळी ऍमेझोनमध्ये काम करणाऱया फ्लिपकार्टने एवढे मोठे बस्तान बांधले की जगातल्या सगळ्यात मोठय़ा ऑनलाइन शॉपिंग पुरवणाऱया ऍमेझोनलादेखील फ्लिपकार्टने धोबीपछाड देण्यास सुरुवात केली. म्हणूनच की काय ऍमेझोनलादेखील फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करावीशी वाटली. पण बन्सल आणि कंपनीने गेल्या आठवडय़ात जगात सगळ्यात मोठी उलथापालथ होईल अशी घोषणा केली आणि ती म्हणजे जगातील सगळ्यात मोठी किराणा माल आणि इतर गोष्ठा विकणाऱया दुकानांची साखळी असणाऱया वॉलमार्टने काही अब्ज रुपये देवून फ्लिपकार्टला विकत घेतल्याची. साधे पुस्तके विकणारी फ्लिपकार्ट त्यामुळे आता जगातील सगळ्यात मोठय़ा ऑनलाइन शॉपिंग पुरवणाऱया संकेतस्थळामध्ये गणले जाईल. फ्लिपकार्टची टॅगलाइन आहे ‘अब हर विश पुरी होगी’ बंसल्सच्या प्रचंड मेहनतीने त्यांची विश तर नक्की पूर्ण झाली आहे आता बघुया देसी अमेझोन आता भविष्यात काय काय कारनामे करते.

 

आपली प्रतिक्रिया द्या