फरार आरोपी नऊ वर्षांनी जेरबंद

सामना प्रतिनिधी । किल्लारी

मुलीला फुस लाऊन पळवून नेल्या प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला नऊ वर्षांनंतर जेरबंद करण्यात किल्लारी पोलिसांना यश आले.

या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात नऊ वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी शोध घेऊनही आरोपीचा थांगपता लागत नव्हता. गुप्त माहीतीवरून आरोपीला अटक करण्यासाठी सापळा लावण्यात आला. कवानाका येथून आरोपी धमेंद्र आनंदा अवचाळे (30) रा. खरोसा ता. औसा यास नऊ वर्षानंतर अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, स.पो.नि.संदीप कामत, पो उप नि गणेश कदम, पो.हे.काँ चपटे, पो.ना.यादव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.