धुळे जिल्हा परिषदेचे निवडणूक आरक्षण जाहीर

सामना प्रतिनिधी । धुळे

जिल्हा परिषदेच्या डिसेंबर 2018 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी गटांची रचना आणि आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार यंदा जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाईल.

नवीन रचनेत धुळे तालुक्यातून दोन गट कमी झालेत. त्यातील एक गट साक्री तालुक्यात तर शिरपूर तालुक्यात एक गट वाढला. सर्वाधिक 17 सदस्य साक्री तालुक्यातून येतील. त्या पाठोपाठ धुळे 15, शिरपूर 14 आणि शिंदखेडय़ातून 10 सदस्य जिल्हा परिषद सभागृहात येतील. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांचे आरक्षण लक्षात घेऊन यंदा इतर मागासवर्गीयांसाठी 5 गट रचना जाहीर करतानाच आरक्षित करण्यात आले. नवीन रचनेत अनुसूचित जातीसाठी 3 तर जमातीसाठी 23 गट आरक्षित झाले आहेत. जमातीचे बहुसंख्य गट हे साक्री आणि शिरपूर तालुक्यांतील आहेत.

निवडणूक आयोगाने डिसेंबर 2018 मधील जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नियोजन केले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार सोमवारी जिल्हा परिषदेच्या गटांची रचना आणि आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरन, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे, जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांनी गर्दी केली होती.

सर्व प्रथम जिल्हाधिकारी रेखावार यांनी आयोगाचे निर्देश लक्षात घेऊन लोकसंख्येचा आढावा मांडला. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 3 गट राखीव झाले. त्यात थाळनेर, निमडाळे आणि विरदेल या गटांचा समावेश आहे. निमडाळे वगळता उर्वरित दोन गट महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी 23 गट आहेत. त्यात कोळीद, पळासनेर, बुरखेडे, बोराडी, सुकापूर, दहिवद, वाघाडी, शेलबारी, धमाणे, देउर बुद्रुक, हिसाळे, म्हसदी प्रनेर हे गट महिलांसाठी राखीव असून उर्वरित गटांमध्ये कुडाशी, पिंपळगाव बुद्रुक, रोहिणी, सांगवी, दहिवेल, सामोडे, छडवेल कोर्डे, तऱहाडी, भाडणे, जैताणे हे गटदेखील अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. इतर मागासवर्गीयांसाठी 15 गट आहेत. त्यातील बेटावद, मालपूर, नेर, लामकानी, बोरविहीर, नरडाणा, बोरकुंड, मुकटी हे गट महिलांसाठी राखीव आहेत. याशिवाय नगाव, रतनपुरा, फागणे, लामकानी, बोरविहीर, कापडणे, खलणे, कुसुंबा, शिरूड हे गट इतर मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 15 गट आहेत. वनावल, वर्षी, पिंपळनेर, बळसाणे, विखरण, सोनगीर हे सहा गट महिलांसाठी आहेत. याशिवाय सर्वसाधारण गटात शिंगावे, मांजरोद, विखरण, मेथी, चिमठाणे, दुसाणे, निजामपूर, सोनगीर, आर्वी आणि कासारे या गटांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या 56 पैकी 28 महिला असतील. अनुसूचित जमातीच्या 3 पैकी 2 महिला, जमातीच्या 23 पैकी 12 महिला, इतर मागासवर्गीयांच्या 15 पैकी 8 महिला तर सर्वसाधारण गटातील 15 पैकी 6 महिला असतील.