सूसूला उतरला आणि पसार झाला…

सामना ऑनलाईन । वर्धा

वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील जामणी येथे लघुशंकेचा बहाणा करून एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. मंगेश कोडापे असे या आरोपीचे नाव असून तो विनयभंगाच्या आरोपात अटक होता. हिंगणघाट पोलीसांच्या हातातून आरोपी फरार झाल्याने वार्ध्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांच्या गाडीतून उतरलेल्या आरोपी मंगेश कोडापे याने पोलिसांच्या हाताला झटका मारून पळ काढला आहे.

विनयभंगाच्या प्रकरणात अटक असलेल्या मंगेशला हिंगणघाट पोलिसांनी वर्धा येथे न्यायालयात हजर करण्यासाठी नेले होते. न्यायालयाने आरोपीला 7 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. वर्ध्याहून हिंगणघाट येथे परतीच्या वाटेत असतांना वायगाव निपाणी चौकामध्ये आरोपी मंगेश लघुशंकेचे कैारण देऊन पोलिसांच्या गाडीतून उतरला. यावेळी मंगेश सोबत पोलीसही होते. मात्र पोलिसांच्या हाताला झटका देईन त्याने शिताफीने धुम ठोकली. दरम्यान, बुधवारी उशीरापर्यंत पोलिसांना आरोपीचा पत्ता लागला नसून हिंगणघाट पोलीस शोध घेत आहेत.