पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

सामना प्रतिनिधी । अकलूज

बुधवारी सकाळी दहा वाजता कैवल्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिह्याची हद्द ओलांडून सोलापूर जिह्यात धर्मपुरी येथे प्रवेश करतो. सोलापूर जिह्याचे सरहद्दीवर जिह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जि. प. अध्यक्ष, माळशिरस तालुक्याचे आमदार पालखी सोहळ्याचे स्वागत करतात. साधु-संत तालुक्यात प्रवेश करणार म्हणून प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यापासून ते गटारींवर पावडर टाकण्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

पालखी सोहळा धर्मपुरी येथे शासकिय स्वागत स्विकारून धर्मपुरी येथील डाकबंगल्यावर दुपारचा विसावा घेऊन मुक्कामासाठी नातेपुते शहरात प्रवेश करतो. नातेपुते येथे मुक्काम करून दुसऱया दिवशी मांडवे येथे विसावा घेऊन दुपारी पुरंदावडे येथे सोहळ्यातील व माळशिरस तालुक्यातील पहिले गोल रिंगण घेतले जाते. त्यानंतर पालखी सोहळा माळशिरस मुक्कामी जातो. माळशिरस येथील मुक्काम आटोपून सकाळी ८.३० च्या सुमारास सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस पाटी येथे होते. याठिकाणी वारकरी विविध मनोरंजनाचे खेळ करीत उडीचा प्रेक्षणीय खेळ सादर करतात. दुपारचा विसावा निमगाव पाटी येथे होऊन पालखी सोहळा भाईनाथ महाराज भेट ऊरकून वेळापूर नजिक धाव्यावरून धावा घेत वेळापूर शहरात दाखल होण्यापुर्वी मानाचे भारूड सादर केले जाते.

गुरूवारी रोजी पुणे जिह्यातून (सराटी येथून) जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा निरा स्नान उरकुन माळशिरस तालुक्यात प्रवेश करतो. या पालखी सोहळ्याचे स्वागत पालकमंत्री, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी, माळशिरस तालुक्याचे आमदार, पोलीस प्रमुख व इतर शासकिय अधिकारी करत असतात. अकलूजच्या गांधी चौकातून पालखी रथाचे सारथ्य खा. विजयसिंह मोहिते-पाटील करतात. त्यानंतर हा पालखी सोहळा ग्रामप्रदक्षिणा करून जुन्या अकलूज गावातील विठ्ठल मंदिरात आरती करणार. त्यानंतर रिंगण व मुक्कामासाठी सदाशिवराव माने विद्यालयात दाखल होऊन प्रांगणात भव्य रिंगण सोहळा साजरा केला जातो. त्यानंतर पालखी मुक्कामासाठी विसावली जाते. दुसऱया दिवशी सकाळी ९ च्या सुमारास माळीनगर येथे उभे रिंगण घेतले जाते. दुपारचे जेवण करून पालखी सोहळा 25/4, महाळुंग, श्रीपूर मार्गे बोरगांव येथे मुक्कामास जाते. दुसऱया दिवशी तोंडले नजिक धाव्यावरून धावा घेत सोहळा पटवर्धन कुरोली येथे मुक्कामास जातो.

दि. १ रोजी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापूरचा मुक्काम हलवून ठाकूरबुवा येथे गोल रिंगण सोहळा, तोंडले येथे नंदाच्या ओढय़ात पादुका स्नान घालण्यात येऊन दुपारचा विसावा बोंडले येथे घेतला जातो. तेथुन पालखी सोहळा मार्गस्थ होऊन पंढरपूर तालुक्यातील टप्प्यानजीक संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानकाका महाराज या दोन बंधुंचा भेटीचा नेत्रदिपक सोहळा साजरा केला जातो.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबतच माळशिरस तालुक्यातून संत सोपानकाका, संत चांगा वटेश्वर, संतनाथ महाराज, गवारशेठ लिंगायत वाणी, संत गोरोबा दिंडी सोहळा, रायगडावरून निघालेली छत्रपती शिवरायांची पालखी, गोंदावलेकर महाराज, संत साईबाबा व संतांच्या पालख्या माळशिरस तालुक्यातून पंढरपुरकडे जात असतात.