मराठी चित्रपट आता मोबाईलवर पाहा…

>>मनीषा सावंत, [email protected]

इंजीनियरींगचं शिक्षण घेतलेले दोन जिगरबाज तरुण… पण मराठी सिनेमा विश्वात काहीतरी करून दाखवायची प्रचंड तळमळ… त्यासाठी ‘बिर्याणी’ नावाच्या एका लघुपटाची निर्मितीही दोघांनी मिळून ४० हजारांत केलेली… आता ऊर्मी मोठ्या पडद्याच्या ओढीची… मोठा सिनेमा काढायचा तर किती लागणार… फार फार तर दोन लाख रुपये… दोघांनी मिळून एकेक लाख रुपये साठवले आणि सुरू केला मोठ्या पडद्यावरील दोन तासांचा पूर्ण लांबीचा सिनेमा बनवण्यासाठीचा प्रयत्न… हे दोघे तरुण म्हणजे सचिन आंबात आणि संजय मोरे… आपला ‘लव्ह लफडे’ हा सिनेमा आता ते चक्क एचसीसी नेटवर्क नावाच्या मोबाईल ऍपवर रिलीज करणार आहेत.

या अनोख्या प्रकाराबाबत माहिती देताना दिग्दर्शक सचिन आंबात याने सांगितले की, आतापर्यंत कोणत्याही अॅपवर प्रदर्शित झालेले सिनेमे दाखवले जात. पण एचसीसी नेटवर्क या अॅपने फक्त मराठी सिनेमे आणि तेही प्रदर्शित झालेले नाहीत असे मराठी सिनेमे दाखवण्याचं ठरवलं आहे. यात त्यांनी आमचा ‘लव्ह लफडे’ हा सिनेमा पहिला निवडला आहे. जूनमध्ये तो रिलीज होईल. साधारणपणे कोणताही सिनेमा सेन्सॉरकडून पास होणे गरजेचे असते. आता हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न होता थेट मोबाईल अॅपवर प्रदर्शित होणार म्हटलं म्हणजे सेन्सॉरची संमती घ्यायची गरज नाही का? असं विचारता सचिन आंबात म्हणाला, तसं नाही… हा सिनेमा रीतसर सेन्सॉर संमतच असणार आहे. हे अॅप प्लेस्टोरवर मोफत डाऊनलोड करता येणार असले तरी त्यावरील सिनेमा पाहण्यासाठी मोबाईल युजर्सना १५० किंवा १८० रुपये द्यावे लागतील असेही त्याने स्पष्ट केले. या अॅपवर एखादा सिनेमा केवळ तीन महिने असणार आहे. त्यानंतर त्या चित्रपटाऐवजी दुसरा चित्रपट समोर दिसेल.

मुळात हे तरुण इंजीनियरींगचे विद्यार्थी… पण कॉलेज करता करताच त्यांनी ‘बिर्याणी’ नावाचा लघुपट बनवला. त्यासाठी त्यांना ४० हजार रुपये खर्च आला. २५ मिनिटांच्या या लघुपटाला तब्बल ८ पुरस्कार मिळाले. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या या दोघांनी त्यानंतर मोठा सिनेमा बनवण्याचं ठरवलं. दिग्दर्शनाचा काहीही अनुभव नसताना त्यांनी मोठी उडी घ्यायचं मनावर घेतलं. याबाबत बोलताना सचिन म्हणाला, २५ मिनिटांच्या लघुपटासाठी ४० हजार खर्च झाला, तर ३ तासांचा सिनेमा बनवायला जास्तीतजास्त २ लाख रुपये खर्च येईल असं वाटलं. त्यासाठी हे २ लाख रुपये संजय मोरे आणि मी मिळून जमवले. काम सुरू तर केलं, पण मोठ्या पडद्यावर सिनेमा बनवायचा तर काय काय अडचणी येतात त्या कळायला लागल्या. मग सुमित गायकवाड आमचे निर्माता म्हणून उभे राहिले. दिशा कुलकर्णी यांनीही मदत केली असं सचिन म्हणाला.

रीतसर प्रमोशनही करतोय…
लघुपट करताना कमी बजेटमध्ये काम करता आलं, पण मोठा सिनेमा बनवताना आम्हाला ६० जणांच्या तंत्रज्ञांचा गट हॅण्डल करावा लागला. आपल्या डोक्यातील चित्रपट मोठ्या पडद्यावर साकारतोय का त्यावर लक्ष ठेवणं, सगळा ग्राफ मेंटेन ठेवणं जरा अवघड गेलं, पण तोच तर मोठा अनुभव असतो. ते आम्हाला शिकायला मिळालं. एक वेगळा अनुभव होता. आम्हाला फिल्ममेकिंग ही प्रोसेस कळली. आमचा सिनेमा थेट मोबाईल अॅपवर जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण त्यासाठी आम्हाला तो लोकांपर्यंत पोहोचविण्याचं मुख्य काम करायचं आहेच. तेच सध्या आम्ही करतोय. बाकीचे चित्रपट प्रदर्शित होण्याआधी जसे प्रमोशन करतात तसेच आम्हीही करत आहोत. प्रिंट मिडीया, सोशल मिडीया यांचा वापर करतोय. तेथे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन बघण्यापेक्षा मोबाईल अॅपवर सिनेमा पाहा असं सांगायचं आहे, असंही त्याने स्पष्ट केलं.