उमेदवारांच्या नातेवाईकांच्या खात्यांवर राहणार लक्ष

सामना प्रतिनिधी । नगर

निवडणुकीत उमेदवार असलेल्या नातेवाईकांच्या खात्यावरही आता निवडणूक आयोगाचे लक्ष राहणार आहे. उमेदवारांसोबत आता निवडणूक अर्जामध्ये नमूद केलेले नातेवाईकांच्या खात्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. त्या खात्यावर जमा होणारी व त्यातून काढली जाणारी रक्कम यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

याबाबत संबंधित बँकांकडून निवडणूक अधिकार्‍यांना माहिती द्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने यंदा उमदेवारी अर्जात ही बदल केला आहे. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारास अर्जासोबत प्रतिज्ञापत्र द्यावे लागत होते. त्यामध्ये आता नव्याने स्वत:च्या व कुटुंबाच्या नावावर असलेली विदेशातील गुंतवणूक, त्याठिकाणची मालमत्ता, थकबाकी नमदू करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना 70 लाख रूपये खर्च करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यापुढे खर्च झाल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांच्या नातेवाईकांच्या खात्यातून व्यवहार होण्याची शक्यता आहे. यावर बँकांनी लक्ष ठेवून एक लाख ते 10 लाखांपर्यंतच्या व्यवहारांवरील माहिती आयोगाला देण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

धनाढ्य उमेदवारांचा यंदा निवडणूक आखाड्यात ताकद लागणार आहे. निवडणूक आयागाने उमदेवारांना अर्ज भरण्यासाठी सुविधा अ‍ॅप, नागरिकांना आचारसंहितेच्या तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजिल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अ‍ॅपवर येणार्‍या तक्रारी सोडविण्यासाठी स्वतंत्र भरारी पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.