नांदेडात तीन दिवसाआड पाणी, ही तर मनपा निर्मित कृत्रिम पाणीटंचाई – हेमंत पाटील

1

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड मनपाच्या हद्दीत निर्माण झालेली पाणीटंचाई ही मनपा निर्मित कृत्रिम पाणीटंचाई असून, पाण्याचा अपव्यय, मोठ्या प्रमाणात फुटलेल्या पाईपमधून वाया जाणारे पाणी, अवैध नळ कनेक्शन यामुळेच ही पाणीटंचाई निर्माण झाली असली तरी नांदेडकरांनो, काळजी करु नका, जून अखेरपर्यंत नांदेडकरांना पाणी टंचाई भासू देणार नाही, असा समाधानकारक दिलासा शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी दिला आहे.

नांदेड शहरात उद्यापासून तीन दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. विष्णूपुरी प्रकल्पात केवळ साडेनऊ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध असल्याने व बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे. दोनच महिन्यापूर्वी दिग्रस बंधाऱ्यातून १५ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. तत्पूर्वी जानेवारी महिन्यात विष्णूपुरी प्रकल्पात पुरेसे पाणी असताना त्याचवेळी नियोजन का केले नाही, भरमसाठ पाण्याचा वापर आणि नियंत्रण नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले. महिन्याला साधारणतः ३ दलघमी एवढे पाणी नांदेडकरांना लागते. अर्थात वर्षाला हा आकडा ३२ ते ३३ दलघमी एवढा होतो. मात्र नियोजनाचा अभाव, मनपात परस्पर ताळमेळ नसणे, पदाधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष, अवैध नळ कनेक्शन आणि हजारो लिटर पाणी फुटलेल्या पाईपमधून वाया गेल्याने नांदेडकरांना मनपा निर्मित कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे.

आचारसंहितेच्या काळात पाणीटंचाई, चाराटंचाई, दुष्काळाचे प्रश्न याबाबत कुठलेही राजकारण करायचे नसते, या प्रश्नावर प्रशासनाने विनाकारण बाऊ करायचा नसतो मात्र सध्या मनपाचा कारभार हा अलबेल सुरु असून, कुणाचेही कुणावर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. आमदार हेमंत पाटील पुढे म्हणाले की, सार्वजनिक नळांना पाणी सोडताना त्याचा वापर योग्य होतो की नाही, फुटलेल्या पाईपमधून आजपर्यंत किती पाणी वाया गेले, जलाशयात असलेल्या पाणीसाठ्यासंदर्भात मनपाने काय नियोजन केले, असा सवालही त्यांनी केला आहे. असे असले तरी नांदेडकरांनो, चिंता करु नका, पावसाळा येईपर्यंत तुम्हाला पाणीटंचाई भासू देणार नाही, उध्र्वपैनगंगा प्रकल्पातून दोन पाणी पाळ्या अद्यापी शिल्लक आहेत, त्याचप्रमाणे अन्य प्रकल्पांतून पाणीसाठा उपलब्ध कसा होईल यासाठी जलसंपदा मंत्र्यांशी व मुख्य अभियंता कोहिरकर यांच्याशी आपली चर्चा झाल्याचे आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले.

पाण्याचा अवैध वापर, तुट्या नसलेले नळ कनेक्शन, अवैध नळ कनेक्शन व अन्य तांत्रिक बाबींकडे मनपाने लक्ष दिल्यास नांदेडकरांना पाणी भरपूर मिळू शकेल, मनपाने निर्माण केलेली ही कृत्रिम पाणीटंचाई याबाबत आपण आवाज उठविणार असून, नांदेडकरांना पाणी कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.