मनमाडकरांना १३ दिवसां आड पाणी, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

सामना ऑनलाईन, मनमाड  

पालखेड धरणाचे पाणी मनमाड, येवला शहरासाठी सोडण्यात आले आहे. सध्या पालखेड धरणातही २१ टक्केच पाणीसाठा आहे. त्यातून हे ७५० दशलक्ष घनफुट पाणी सोडले जाणार आहे. दररोज होणारा पाण्याचा वापर तसेच उन्हामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या वाघदर्डी धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी झाला. पालखेड रोटेशनच्या पाण्यावर पुढील किमान ४५ दिवस मनमाड व येवलेवासीयांना तहान भागवावी लागणार आहे. पाणीचोरी होऊ नये यासाठी फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यानी दिल्या आहेत.

पालखेडमधून सोडण्यात येणारे पाणी हे केवळ पिण्याच्या पाण्याचे आहे. ते सिंचनासाठी अडविले जाऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. पाणी सोडल्यानंतर वाहत्या मार्गावर वीजपुरवठाही खंडित केला जाणार आहे. तसेच प्रत्येक पाच किलोमीटरवर कार्यकारी अभियंता, पोलीस कर्मचारी, वीज महावितरण कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहे.

पुढील किमान ६० दिवस या पालखेड धरणावर अवलंबून असणाऱ्या गावांना पिण्याची तहान भागवावी लागणार आहे. गेल्या वर्षी या काळात म्हणजे एप्रिल व मेमध्ये मनमाड शहराला २५ ते ३० दिवसांआड पाणीपुरवठा सुरू होता. या वर्षी पाणीटंचाई असली तरी नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या साठय़ातून किमान ११ ते १३ दिवसांआड सध्याच्या वितरण व्यवस्थेत हे पाणी पुरू शकते असे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर म्हणाले.

शहराची लोकसंख्या १ लाख २ हजार असून दररोज माणसी ७० लिटरप्रमाणे ७० लाख लिटर पाण्याची गरज आहे. पण सततच्या अपुऱ्या पावसाने धरण भरत नसल्याने ही गरज भागविणे शक्य नाही. १० वर्षांपासून दहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या १३ दिवसांआड फक्त दोन तास पाणी पुरवले जात आहे. दरमहा सरासरी १६ दशलक्ष घनफुट (१६० लाख लिटर) पाणी शहराला लागते. सध्याच्या वितरण व्यवस्थेत वीज पुरवठय़ाचा व लिकेजचा व्यत्यय आला नाही तर उपलब्ध होणारा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरविण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे.
पद्मावती धात्रक, नगराध्यक्षा

  • Rahul Naik

    arere…jalyukt shivar sarkhya yojana aana ithe. pavus khup padato pan sagala vahun jato.