सरकारी मदतीची घागर रिकामीच

कैलास भरोदे । शाहापूर

पाण्यासाठी तब्बल दहा किलोमीटर पायपीट केल्याने शहापूरच्या तुकाराम आगिवले या आदिवासी तरुणाला जीव गमवावा लागल्याने गेल्या वर्षी एकच खळबळ उडाली. अब्रू वाचवण्यासाठी सरकारने आगिवले यांच्या कुटुंबीयांना खासगी कंपनीत नोकरी, घरकुल, उदरनिर्वाहासाठी घरघंटी अशी आश्वासने देऊन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेला वर्ष उलटत आले तरीही सरकारच्या आश्वासनांची घागर रिकामीच आहे. आगिवले कुटुंबातील सदस्यांना ना नोकरी मिळाली, ना घरकुल. इतकेच नव्हे तर ज्या दांड गावामध्ये ही घटना घडली ते गाव अजूनही पाण्यासाठी व्याकूळ आहे.

शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील ग्रामस्थांना दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तालुक्यातील टंचाईग्रस्त दांड येथे तर पाण्यासाठी तब्बल दहा किमीची पायपीट करावी लागते. गेल्या वर्षी याच दांड गावात एप्रिल महिन्यात तुकाराम आगिवले हा ३५ वर्षीय आदिवासी तरुण भातसा धरणाच्या बँकवॉटर असलेल्या आंबळे डोहात पाणी आणण्यास गेला होता. दुपारच्या कडक उन्हात त्याला डोहाजवळ जाताच चक्कर आल्याने डोहात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडून मृत तुकाराम आगिवलेच्या कुटुंबीयांना घरकुल, उदरनिर्वाहासाठी घरघंटी व मुलांसाठी खासगी कंपनीत सुरक्षारक्षकांची नोकरी देण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते, तर दांड गावासाठी पिण्याच्या पाण्याची विहीर व समाज हॉल बांधून देण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

उपासमारीचे संकट

तुकाराम यांच्या घरात त्याची आई सखूबाई, वडील ठमा, पत्नी चंद्रभागा, मुलगा अर्जुन व छाया, रेणुका व रेखा या तीन मुली असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूनंतर आटगाव येथे खासगी कंपनीत रोजंदारीवर काम करणाऱया अर्जुन या 18 वर्षीय मुलावर प्रपंच चालविण्याची जबाबदारी पडली आहे. अर्जुनच्या तुटपुंज्या पगारात खर्च भागत नसल्याने कुटुंबावर उपासमारीचे संकट कोसळले आहे.

हातात टेकवले फक्त २० हजार रुपये

मदतीच्या नावाने शासनाकडून आगिवले कुटुंबीयांच्या हाती केवळ २० हजार रुपये टेकवण्यात आले होते. महसूल विभागाकडून राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत त्यावेळी २० हजार अदा करण्यात आले होते, तर संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा ९०० रुपये अदा करण्यात येतात, असे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी सांगितले.