कल्याण-डोंबिवलीत नववर्षाचे ‘पानीकम’ स्वागत

सामना ऑनलाईन । डोंबिवली

पाण्याची चोरी आणि गळती रोखण्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे या शहरात नवीन वर्षाचे स्वागत पाणी कपातीने होणार आहे. १ जानेवारी २०१८ पासून शहरात १४ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून ही कपात येत्या १५ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. महिन्यातून पहिल्या आणि तिसऱया मंगळवारी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

शहरात होत असलेली पाण्याची चोरी आणि गळती रोखण्यात पाणी पुरवठा विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांतून शहरात प्रमाणापेक्षा जास्त पाण्याचा उपयोग करण्यात आला आहे. अधिक वापर झालेल्या पाण्याचा ताळमेळ बसविण्यासाठी उद्यापासून शहरात १४ टक्के पाणी कपात लागू करण्याची घोषणा महापालिका प्रशासनाने केली आहे. बारावे, मोहिली, नेतीवली आणि टिटवाळा या जलशुद्धीकरण केंद्रातूनही पाणी कपात केली जाणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांनी सांगितले आहे. उल्हासनदीतील पाण्याच्या नियोजनासाठी हा निर्णय लघु पाटबंधारे खात्याने घेतल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हलगर्जीपणा प्रशासनाचा; ताप मात्र सर्वसामान्यांना

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन पाणीचोरी आणि पाण्याची गळती रोखण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळेच शहरावर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाणी कपात लादावी लागली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा मात्र शहरातील सर्वसामान्य नागरिकांना भोगावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

काटकसर करा

येत्या १५ जुलैपर्यंत शहरात महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱया मंगळवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या दोन्ही दिवसांमध्ये नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणीचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहनही महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.