मुंबईकरांचे पाणी 9 पैशांनी महाग

47

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईकरांना होणाऱया पाणीपुरवठय़ाचा खर्च वाढल्याने पालिकेने घरगुती पाणीपट्टीत 9 पैशांनी तर व्यावसायिक पाणीपट्टीत 95 पैशांची वाढ केली आहे. येत्या 16 जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे. दर एक हजार लिटरमागे ही दरवाढ होणार असून 2012 मध्ये पालिकेत बहुमताने मंजूर झालेल्या ठरावानुसार प्रतिवर्षाप्रमाणे पाणीपट्टीत सुधारणा करण्यात आली आहे.

मुंबईकरांना दररोज पालिकेकडून 3800 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या तलावांमधून आणले जाते. हे पाणी आणण्यासाठी जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, देखभाल खर्च, विजेचा खर्च, शासकीय धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी यांच्या खर्चात दरवर्षी वाढ होत असते. या पार्श्वभूमीवर वाढणारा खर्च भागवण्यासाठी पालिकेत 2012 मध्ये दरवर्षी किमान 8 टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. यानुसार या वर्षीदेखील ही पाणीपट्टी वाढवण्यात आली आहे.

पालिकेच्या नियमानुसार 2012 मध्ये बहुमताने मंजूर झालेल्या ठरावानुसार आणि राज्य सरकारच्या गाइडलाइननुसार ही दरवाढ करण्यात आली आहे.
– यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती

आपली प्रतिक्रिया द्या