बुराई नदी पाण्याने भरली; दुसाणे, बळसाणे गावांची पाणीटंचाईपासून सुटका

30


सामना प्रतिनिधी । धुळे

साक्री तालुक्यातील दुसाणे, बळसाणे, सतमाणे, कढरे या गावांचा पाणीप्रश्न तीव्र झाल्याने अखेरीस फोफादे गावाजवळील बुराई मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बुराई नदीत 15 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्यामुळे ग्रामस्थांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात यंदा सरारीच्या तुलनेत सत्तर टक्के पाऊस झाला. गेल्या चार वर्षांपासून पाऊस सरासरी गाठत नाही. त्यामुळे सर्वत्र पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यंदा तर भर हिवाळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना टँकरने पाणी मागवावे लागले आहे. साक्री तालुक्यातील दुसाणे, बळसाणे, सतमाणे, कढरे या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. जनावरांची तहान भागविणे कठीण झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 5 फेब्रुवारीला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धरणातील पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. बुराई मध्यम प्रकल्पात 1 हजार 796 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यापैकी 15 दशलक्ष घनफूट पाणी गुरुवारी बुराई नदीच्या पात्रात सोडण्यात आले. देवी गावाजवळ वाळूचा पट्टा आहे. त्यामुळे येथे पाणी जिरेल. गावाचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी अजून जास्तीचे पाणी सोडायला हवे अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे. पाणी सोडताना कार्यकारी अभियंता शहापुरे, उपअभियंता बी.ए.बडगुजर, कनिष्ठ अभियंता प्रशांत खैरनार, बी.आर.पाटील यांच्यासह कालवा निरिक्षक उपस्थित होते. बुराई मध्यम प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

एप्रिल-मे महिन्यात पुन्हा तेच
जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या सुटणार आहे. पाणी सोडल्यामुळे रब्बी हंगामासाठी पाणी मिळू शकेल. नदीकाठावरील अनेक गावांच्या पाणी योजनांच्या विहिरींची पातळी उंचावेल. त्यामुळे काही काळासाठी का होईना, पाणीटंचाईच्या तीव्रतेतून या गावांची सुटका होणार आहे. तरी एप्रिल आणि मे महिन्यांत मात्र याच गावांतील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या