वृद्ध महिलेला लागलेली आग विझवण्यासाठी पाणीच नाही

1
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । धुळे

धुळे शहरातील मोगलाई परिसरात स्टोव्हच्या भडक्याने एका वृद्ध महिलेच्या शरीराने पेट घेतला. त्यात त्या काही प्रमाणात भाजल्या. आग लागल्याची ओरड ऐकताच शेजाऱ्यांनी धाव घेतली खरी, पण गेले आठ दिवसांपासून पाणीपुरवठाच झाला नसल्याने आग विझवण्यासाठी घरात पाणीच नसल्याने नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला. या वेळी त्यांनी थेट महापालिकेवर धडक देत निदर्शने केली.

धुळे शहरातील मोगलाई परिसरात सलग आठ दिवस पाणीपुरवठा झालेला नाही. पिण्याचे पाणी मिळविण्याची धडपड सुरू झाली आहे. मोगलाई परिसरातच एका घरात अग्निउपद्रवाची दुर्दैवी घटना घडली. त्यात वृद्ध महिलेच्या शरीराने पेट घेतला. त्या वेळी पाण्याची उपलब्धता असती तर शरीराला लागलेली आग लवकर नियंत्रणात आली असती. पाणी नसल्याने महिला गंभीररित्या भाजल्यामुळे नागरिकांचा भावनांचा उद्रेक झाला. या वेळी महापालिकेत निदर्शने करण्यात आली. काही भागात सलग सात तास पाणीपुरवठा होतो. महापालिकेचा हा भोंगळ कारभार कधी सुधारणार? शहरात सरासरी अनेक भागांमध्ये चार दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. सणासुदीच्या काळात पाण्याची गरज असताना त्यादृष्टीने महापालिकेने काळजी घेतली पाहिजे. पाणीपुरवठा विभागाबाबत अनेकदा तक्रारी होतात, पण दखलच घेतली जात नसल्याने आयुक्तांच्या दालनासमोर नागरिकांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला.